Supriya sule : पवारांचा पक्ष अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणाची चर्चा, याचा अर्थ सुप्रिया सुळेंचे स्वतंत्र नेतृत्व उभंच राहीना!!

महाराष्ट्र विधानसभेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जबरदस्त तडाखा बसल्यानंतर दोनच महिन्यांच्या आत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली, याचा अर्थ पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेच्या वळचणीला येण्याची तयारी सुरू झाली, हा जेवढा खरा आहे, तेवढाच सुप्रिया सुळेंचे स्वतंत्र नेतृत्व उभे राहात नाही, हा अर्थ देखील खरा आहे!!

सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाची अखिलेश यादव, उमर अब्दुल्ला, उदयनिधी स्टॅलिन, नारा लोकेश वगैरे नेत्यांशी तुलना सोडून द्या. परंतु, महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांच्या स्वतंत्र नेतृत्वांमध्ये देखील सुप्रिया सुळे या अद्याप स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकलेल्या नाहीत, हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीने सिद्ध केले.

वास्तविक 2024 ची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या स्वतंत्र प्रादेशिक नेतृत्वांसाठी देखील तेवढीच आव्हानात्मक होती. कारण हे दोघेही नेते जरी अनुभवी मंत्री असले आणि नंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर राहिले असले, तरी प्रादेशिक पक्षांचे मुख्य नेते म्हणून त्यांच्या नेतृत्वाचा कस 2024 पर्यंत लागलेला नव्हता. तो सुरुवातीला लोकसभा निवडणुकीदरम्यान लागला. त्यामध्ये एकनाथ शिंदे काही अंशी का होईना, पण यशस्वी ठरले, पण अजितदादा मात्र पूर्ण अपयशी ठरले होते आणि त्यावेळी देखील अजितदादांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादी समोर हरली, याचा अर्थ काकांनी पुतण्यावर मात केली, असा काढला गेला होता. तो योग्य होता. पण विधानसभा निवडणुकीचे निकाल मात्र पूर्ण उलटे लागले आणि पुतण्याने काकांवर मात करून दाखवली.

विधानसभा निवडणुकीत अजितदादांचे प्रादेशिक नेतृत्व शरद पवारांच्या प्रादेशिक आणि “राष्ट्रीय” नेतृत्वाला भारी ठरले. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचे नाव खऱ्या अर्थाने पुढे कुठेच आले नव्हते. जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीसारखाच परफॉर्मन्स विधानसभा निवडणुकीत दाखवला असता, तर आज जी अजितदादांच्या राष्ट्रवादीत शरद पवारांची राष्ट्रवादी विलीन होणार अशी चर्चा सुरू आहे, त्या उलट चर्चा सुरू झाली असती. अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार, या चर्चेचे पेव फुटले असते आणि त्यावेळी शरद पवारांनी “डाव” टाकून कदाचित सुप्रिया सुळे यांचे नाव जोरकसपणे पुढे आणून त्यांचे नेतृत्व अजितदादांवर भारी ठरवून दिले असते. अजितदादांना सुद्धा सुप्रिया सुळेंचे नेतृत्व मान्य करण्याच्या खेरीज दुसरा पर्याय उरला नसता. कारण त्यांच्याबरोबर भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेले नेते आणि आमदार शरद पवारांकडे परत जाऊन सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करू लागले असते.

पण विधानसभा निवडणुकीचे निकाल एवढे विपरीत लागले, की सुप्रिया सुळे यांचे प्रादेशिक नेतृत्व स्वतंत्रपणे उभेच राहू शकले नाही. किंबहुना शरद पवारांना ते उभेच करता आले नाही. शरद पवार नेहमी सुप्रिया सुळे यांना केंद्रीय राजकारणात रस असल्याचे सांगत राहिले. त्यापलीकडे महाराष्ट्रात प्रादेशिक पातळीवर त्यांच्या कर्तृत्वाला कुठे धुमारे फुटतील, असे स्वतः पवार देखील म्हणू शकले नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून काका – पुतण्याच्या एकत्रीकरणाच्या चर्चा राजकीय वातावरणात सोडून प्रत्यक्षात काकांच्या पुतण्यापुढे किंबहुना भाजपच्या सत्तेपुढे शरणागतीची तयारी सुरू करावी लागली आहे.

याबाबतीत सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व आणि राजकीय कर्तृत्व त्यांच्या वडिलांसारखेच तोकडे राहिले. शरद पवार कधी संपूर्ण महाराष्ट्राला कवेत घेणारे नेतृत्व होऊ शकले नाहीत. पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडे खरा राजकीय प्रभाव दाखवू शकले नाहीत. काँग्रेसशी तडजोड केल्याशिवाय पवार कधीही सत्तेवर बसू शकले नाहीत. आपल्या पक्षाचा ते कधी मुख्यमंत्री करू शकले नाहीत. पवारांच्या नेतृत्वाच्या या कायमच मर्यादा राहिल्या.

सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व तर त्याहीपेक्षा फारच मर्यादित राहिले. पवारांच्या वृद्धापकाळात देखील त्या तडफदारपणे पुढे येऊन पक्षाचे कधी नेतृत्व स्वीकारू शकल्या नाहीत. जेव्हा पवारांनी त्यांचे नेतृत्व संपूर्ण पक्षावर लादायचा प्रयत्न केला, त्यावेळी पक्ष फुटला. पण अखंड पक्षाने कधी सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व स्वीकारले नाही. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर तर सुप्रिया सुळे यांच्या प्रादेशिक नेतृत्वाच्या उभारीची शक्यता संपुष्टात आणली. म्हणूनच पवारांना सत्तेपुढे शरणागतीची पुन्हा तयारी सुरू करावी लागली.

Supriya sule leadership doesn’t stand independently in NCP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात