प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा दोनदा राजीनामा देणार होते. परंतु शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखले, अशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये किमान दोन वेळा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे आणि पवार यांना एकच टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा का नाही हे सांगणारे भाजपचे नेते कोण? कौरवसेनेला सल्ला भीष्मपितामह यांनीच द्यावा, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी ठाकरे आणि पवारांचे एकत्रित वाभाडे काढले आहेत. Sudhir mungantiwar targets Uddhav Thackeray and sharad Pawar at once
सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी राज्यातल्या अस्थिर परिस्थिती बाबत वेट अँड वॉच हीच भूमिका घेण्याचा निर्णय झाला. एकनाथ शिंदे यांची मूळ शिवसेना असल्याचा सुधीर मुनगंटीवार यांनी पुनरुच्चार केला. त्यांच्याकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. तो प्रस्ताव आला की त्यावर कोअर कमिटीत चर्चा होऊन मगच निर्णय घेऊ, असे मुंगटीवार म्हणाले.
– भाजपची पावले सावध आणि धीमी
याचा अर्थ भाजप आजही अत्यंत सावधानतेने आणि धीमेपणाने राजकीय पावले टाकताना दिसत आहे. 2019 ची कोणतीही चूक करायची नाही आणि पवारांवर विश्वास ठेवायचा नाही हेच यातून दिसून येत आहे. एकनाथ शिंदे गटाने ना भाजपला प्रस्ताव दिला आहे, ना सरकार स्थापनेचा दावा केला आहे. याबाबतीत सुधीर मुनगंटीवार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या भूमिकेत साम्य दिसले. कोणतेही स्ट्रॅटेजी ठरवायची असते आणि तिची अंमलबजावणी करायची असते तिची वाच्यता बाहेर करायची नसते, असे दीपक केसरकर यांनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत सांगितले.
सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. हीच भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे. अजूनही आम्ही शिवसेनेत आहोत उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मानत आहोत. बाळासाहेब जसे मस्तकी टिळा लावून आशीर्वाद द्यायचे, तसाच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या मस्तकी टिळा लावून आशीर्वाद द्यावा, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा मांडली आहे. यातून एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असलेल्या आमदारांची गट नसून हीच मूळ शिवसेना आहे हेच त्यांनी परत एकदा अधोरेखित केले आहे.
– आदित्यने राऊतांकडून काही शिकू नये
त्याचवेळी संजय राऊत यांच्यावर त्यांनी शरसंधान साधले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपले पिताजी उद्धव ठाकरे यांच्याकडून संयम शिकावा, पण संजय राऊत यांच्याकडून काहीही शिकू नये. ते राष्ट्रवादीच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे ते वाट्टेल ते बोलतात. त्यांना गांभीर्याने घेऊ नये. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याकडून काही शिकू नये. ते तरुण वयातले प्रगल्भ नेते आहेत, अशा शब्दांमध्ये दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांचे वर्णन केले आहे. सुधीर मुनगंटीवार आणि दीपक केसरकर यांच्या भूमिकेत विलक्षण साम्य दिसले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App