विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनामुळे मागील दोन वर्षे सर्वांसाठीच आव्हानात्मक होती. शिक्षण क्षेत्रही त्यापासून अलिप्त राहू शकले नाही. तथापि आता दहावी व बारावीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा होत असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले. Students should have confidence for the exam School Education Minister Pvt. Varsha Gaikwad’s appeal to teachers
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शासन आणि शिक्षण मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांवरील दडपण दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना गायकवाड यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य प्रकल्प संचालक राहूल द्विवेदी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंह यांच्यासह शिक्षण विभागाचे संचालक, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक आदी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाल्या, दहावी बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. यावर्षी विद्यार्थी आणि पालकांना दडपण वाटणे साहजिक आहे. तथापि आपण सर्वांनी त्यांची मदत करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी अभ्यासक्रम तातडीने पूर्ण करून विद्यार्थ्यांची उजळणी घ्यावी, विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा. शासन आणि मंडळाच्या माध्यमातून परीक्षेची वेळ वाढवून देणे, प्रात्यक्षिकाचा आणि लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करणे, सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून देणे, मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन उपलब्ध करून देणे अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांकरिता परीक्षेसाठी चांगले, सुदृढ वातावरण तयार करून देणे ही आपली जबाबदारी असून मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अजूनही काही समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना त्यांनी केली.
आरोग्य जपण्याबरोबरच शिक्षण पूर्ण होणे देखील महत्त्वाचे होते. मुख्यमंत्र्यांनी देखील अतिशय कठीण काळात शिक्षण बंद राहणार नाही यासाठी सूचना केल्या होत्या. आव्हानात्मक दोन वर्षात शिक्षकांनी ऑनलाईन, ऑफलाईनसह विविध माध्यमातून शिक्षण देण्याचे काम केले. याचे कौतुक करून शिक्षण सुरू ठेवण्यासाठी हातभार लावलेल्या सर्व संबंधितांचे गायकवाड यांनी आभार मानले.
वंदना कृष्णा म्हणाल्या, कोरोना ही आयुष्यात एकदा घडणारी बाब समजून पुढे जाण्याची ही वेळ आहे. कोरोनासोबत जगण्याची सवय करून घ्यावी लागणार असून कोरोनामुळे जीवन ठप्प करता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षांविषयीचे दडपण दूर करून शिक्षकांनी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा.
गोसावी यांनी शिक्षण मंडळामार्फत उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबाबत यावेळी माहिती दिली. उपसंचालक विकास गरड यांनी सूत्रसंचलन केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App