विशेष प्रतिनिधी
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आठच महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. या प्रकारामुळे शिवभक्तांमध्ये संताप उसळला, तर महाविकास आघाडीच्या पक्षांनी तोडफोडीचे राजकारण सुरू केले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी संतापून PWD चे कार्यालय फोडले. खासदार सुप्रिया सुळे आणि बाकीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर तोंडसुख घेतले.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे नौदल दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023ला मालवणमध्ये येऊन या पुतळ्याचे लोकार्पण केले होते.
मालवण राजकोट पुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. पुतळ्याची देखभाल आणि निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी देखील सरकारवर निशाणा साधला. ठाण्यातल्या कॉन्ट्रॅक्टरकडे पुतळ्याचे काम दिले होते. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. महाराजांचा पुतळा उभारताना सरकारने काळजी घेतली नाही. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करून घेणे हेच त्यांचे ध्येय होते. हे इव्हेंट सरकार आहे. महाराजांच्या पुतळ्याबाबत देखील यांनी घोटाळा केला असणार. केवळ महाराजांचे नाव वापरायचे, त्यांच्या बाबतीत काळाची घेण्यात आलेली नाही. याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. महाराजांवर श्रद्धा असणारा समाज यामुळे नाराज झाला आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी देखील नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे शिवभक्तांना ऊर्जा देणारे “शक्तीस्थळ” असते, हे स्मारक उभारताना किमान पुढील एका शतकाचा विचार करणे आवश्यक असते. मात्र, केवळ विशिष्ट व्यक्तीच्याच हातून अनावरण करण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार स्मारकांचे काम घाईघाईत उरकण्याची दुर्दैवी प्रथा सध्या देशात प्रचलित होत आहे.
सिंधुदुर्ग येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये ही माझ्यासह तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. घडलेली घटना दुर्दैवी असली तरी शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महायुतीच्या नेत्यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App