प्रतिनिधी
मुंबई : Pratap Sarnaik यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल, असे आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य व परिवहन आयुक्त विवेक भीमनराव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते.Pratap Sarnaik
प्रताप सरनाईक म्हणाले, आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणाऱ्या 83 हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन केवळ 56 टक्के देता आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे महिनाभर कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचा पगार दरमहा 7 तारखेला त्यांच्या बॅक खात्यांत जमा करण्यात येईल. त्यासाठी राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन. परंतु आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही याची जबाबदारी मी घेईन, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिले.
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातील 13 कोटी जनतेला सुरक्षितता आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची “लोकवाहीनी” आहे. भविष्यात एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवासी जनतेला दर्जेदार दळणवळण सेवा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. अर्थात, यासाठी एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सकारात्मक सहकार्य अपेक्षित आहे. त्यांच्या सहकार्याबरोबर शासन म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन देखील लाभाणार आहे.
यापुढे एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच परिवहन सेवा प्रवासीभिमुख व दर्जेदार करण्यासाठी काही चांगले निर्णय देखील आम्ही घेणार आहोत. त्यामध्ये सर्व बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छ व निर्जंतुक असतील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसस्थानकावर व नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे, यावर भर देणार आहोत, असेही सरनाईक म्हणाले.
बसस्थानकांचे आधुनिकीकरण करणार
बस स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी खाजगी विकासकांच्या माध्यमातून बांधा-वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्त्वावर राज्यातील एसटीच्या बहुतांश जागा विकसित करण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 66 जागांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये संबंधित विकासकाने एसटीच्या जिल्हा स्तरांवरील जागेसह तालुका स्तरांवरील जागा व ग्रामीण भागातील जागा अशा 3 जागा विकसित करावयाची आहेत. त्यामुळे एसटीच्या अविकसित जागा देखील चांगल्या विकासकाकडून विकसित होतील.
25 हजार बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या सर्व जुन्या बसेस स्क्रॅप करण्यात येत असून त्याठिकाणी नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यंदा 2640 लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यापैकी 113 आगारात 800 पेक्षा जास्त नवीन बसेस प्रवासी सेवेत रुजू झालेल्या आहेत. सध्या 3 हजार नवीन बसेसची निविदा प्रक्रिया सुरू असून भविष्यात ग्रामीण व दुर्गम भागात उपयुक्त ठरेल अशा मिडी बसेस घेण्यात येणार आहेत. तसेच शहरी भागातील उन्नत स्तरातील प्रवाशांसाठी 200 अत्याधुनिक, वातानुकूलित शयनयान बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी घेतल्या जातील. त्यामुळे भविष्यात शहरापासून गाव खेड्यांपर्यंत, महानगरापासून आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची परिवहन सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App