विशेष प्रतिनिधी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसुत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार राज्यस्तरीय गठीत समितीची आढावा बैठक विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात संपन्न झाली.Significant reduction in the influence of Maoist Naxalism in Gadchiroli; Security operation a big success; Instructions to set up police posts in very remote areas
राज्यातून नक्षलवाद संपूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी अति दुर्गम भागात पोलीस चौकी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले, तसेच सर्व पोलीस चौक्यांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करून सर्व सुविधा देण्यात याव्यात. नक्षलवाद मुक्त झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवीन पोलीस चौकी झालेल्या ठिकाणी विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. त्याचबरोबर शासकीय योजनांचा लाभ गावकऱ्यांना देण्यात यावा, युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक उत्पादनांना विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
– अधिकाऱ्यांना पदोन्नती
बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण पोलिसांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण करून नक्षल चळवळ मोडीत काढण्यासाठी पुढे आलेल्या गडचिरोली पोलिसांना एक कोटी रुपये बक्षीस देण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर नक्षल चळवळीचा बिमोड करण्यासाठी उत्तम काम केलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, मंत्रालय स्तरावर गडचिरोली जिल्ह्यातील कुठलाही विषय आल्यास नियमानुसार त्याला प्राधान्याने पूर्णत्वास न्यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की गडचिरोली येथे नवीन पोलीस अधीक्षक इमारतीचे काम सुरू करण्यासाठी निधी उपलब्धता करून देण्यात येईल. तसेच पोलीस दलात 33 नवीन वाहनांची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
8 ऑक्टोबर 2009 मध्ये भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 पोलीस जवान शहीद झाले होते. यानंतर नक्षलवाद्यांनी आनंद उत्सव साजरा केला होता, त्याच ठिकाणी नवीन पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे या भागात नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला आहे. नक्षलवाद संपुष्टात येत असल्याचे हे मूर्तीमंत उदाहरण असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
– संहारातून विकासाकडे
गडचिरोली जिल्ह्यातील 17.30 किलोमीटर लांबीच्या धोडराज – निलगुंडा – कवंडे रस्त्याची निर्मिती करण्यात येणार, कवंडेच्या पुढे कोरमा नाला पूल आणि बेद्रे पुलाची निर्मिती करण्यात येऊन पुढे बिजापूर पर्यंत रस्ता जोडणी देण्यात येईल. इंद्रावती नदीवर दामरंचा ते सांद्रा मार्गावर 750 मीटर लांबीच्या पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात उत्तम संपर्क यंत्रणेसाठी 2022 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात 271 मोबाईल टॉवर होते आता त्यामध्ये भरीव वाढ होऊन 2023 ते 25 दरम्यान 521 नवीन मोबाईल टॉवरची निर्मिती करण्यात आली आहे. बैठकीला संबंधित वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App