नाशिक : शिंदे सरकार उद्धव ठाकरेंवर करणार “राणे प्रयोग”; पण तो ठरू नये, मोरारजी सरकारवर उलटलेला “इंदिरा प्रयोग”, असा इशारा द्यायची वेळ शिंदे – फडणवीस सरकारने आणली आहे. Shinde government may arrest uddhav thackeray, but it may prove arrest of indira gandhi’s and her comeback situation
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या आदेशावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली होती. आता त्याच धर्तीवर उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी त्यांना अटक करण्याची शक्यता शिंदे – फडणवीस सरकार मधले मंत्री शंभूराज देसाई यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळेच वर उल्लेख केलेला “इंदिरा प्रयोगाचा” इशारा देण्याची वेळ सरकारनेच आणली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंच्या कानाखाली वाजवण्याची भाषा केली होती. त्यावरून मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे प्रचंड संतापले होते. थेट मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची भाषा झाल्याने तो कायद्याचा भंग असल्याचे सांगत त्यावेळच्या ठाकरे – पवार सरकारने नारायण राणेंविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर नोंदविले होते. त्यावेळी शिवसेना अखंड होती. त्यामुळे शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी नारायण राणे यांच्याविरुद्ध प्रचंड आगपाखड केली होती. त्यावेळचे ठाकरे – पवार सरकार मधले मंत्री अनिल परब यांनी पर्सनली लक्ष घालून रत्नागिरी दौऱ्यावर असताना नारायण राणेंना अटक केली होती. त्यामुळे नारायण राणे यांच्या मागे कोर्टाचा ससेमिराला लागला होता. तो आजही कायम आहे.
नारायण राणेंना अटक केल्याचा तो राग मनात ठेवून उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी सध्याचे शिंदे सरकार पुढे सरसावले आहे. यासाठी उद्धव ठाकरेंच्या आजच्या पत्रकार परिषदेचे निमित्त मिळाले आहे. आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना सरकार चालवण्यासाठी नालायक मुख्यमंत्री असे संबोधले. मुख्यमंत्र्यांवर “नालायक” या आक्षेपार्ह शब्दांनी टीका केल्याने हा कायद्याचा भंग आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे घाटत आहे.
हा दोन शिवसेनांमधला सध्या भाजपमध्ये असलेल्या नारायण राणे या विषयावरचा खरा वाद आहे. पण यालाही एक विशिष्ट राजकीय पार्श्वभूमी आहे.
आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, चरण सिंग, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना अटक करून तुरुंगात घातले होते. आणीबाणीत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर खटले चालवले होते. परंतु आणीबाणीत प्रशासकीय पातळीवर खूप अतिरेक देखील झाला होता. परिणामी आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत 1977 मध्ये इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला. काँग्रेस सत्तेवरून उतरली आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आले होते. त्या सरकारमध्ये चरण सिंग यांना गृहमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली होती.
*गृहमंत्री पदावर काम करण्याच्या या संधीचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि त्या लाभातून थेट पंतप्रधान पद मिळवायचे आहे ही चरण सिंगांची महत्त्वाकांक्षा होती. यासाठी त्यांनी एक धाडसी पाऊल उचलायचे ठरवले, पण नंतर ते घातक ठरले, ते म्हणजे इंदिरा गांधींना आणीबाणीतल्या अत्याचाराबद्दल दोषी ठरवून अटक करणे. इंदिरा गांधींना चरण सिंग यांच्या गृह मंत्रालयाने वेगवेगळ्या आरोपांखाली अटक केली. त्यांच्यावर खटला चालवला. त्यांना एका दिवसासाठी तुरुंगात घातले.
परंतु या घटनेचा राजकीय दृष्ट्या पूर्ण उलटा परिणाम झाला. इंदिरा गांधींनी आपल्या अटक नाट्याचा राजकीय चतुराईने एवढा जबरदस्त वापर करून घेतला, की त्यांना 1980 मध्ये राजकीय दृष्ट्या कमबॅक करण्याची खरी संधी त्या अटक नाट्यामुळे मिळू शकली. चरण सिंह यांच्या गृहमंत्रालयाने इंदिरा गांधींची अटक हा विषय अत्यंत ढिलाईने हाताळला होता. त्याचा परिणाम जनता पक्षाला भोगावा लागला. ते कायमचे सत्तेबाहेर फेकले गेले आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्ताधीश झाल्या.
नारायण राणेंना उद्धव ठाकरेंनी अटक केली. याचा धडा त्यांना शिकवण्यासाठी शिंदे सरकारने उद्धव ठाकरेंना अटक करण्याचा हा “राणे प्रयोग” व्यवस्थित हाताळला गेला, तर ठीक. अन्यथा तो “इंदिरा प्रयोगा” सारखा उलटू नये म्हणजे मिळवली!! उद्धव ठाकरे यांना या अटकेच्या निमित्ताने कमबॅकची संधी मिळणार नाही ना??, याचा बारकाईने विचार शिंदे – फडणवीस सरकारने केला पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App