विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, जनावरे आणि जनजीवन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या संसारावर संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे ठोस मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून या संकटाकडे पाहून शेतकऱ्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत द्यावी, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वास्तव पाहणी केली जावी, अशी त्यांची आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे.Sharad Pawar
या संदर्भात शरद पवार म्हणाले की, मराठवाडा आणि विदर्भासारख्या कमी पाऊस पडणाऱ्या भागांत यंदा अतिवृष्टी झाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. सोयाबीन हे शेतकऱ्यांचे प्रमुख आधारपीक असून या पिकाची वाढ सुरळीत झाली होती. मात्र, सलग पाच दिवस वाफ्यात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर पिके कुजून गेली. काही भागात कापूस आणि इतर खरीप पिकेही उध्वस्त झाली आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात काहीही उत्पादन आले नाही. “आपण दुष्काळ पाहिला आहे, पण अशी अतिवृष्टी याआधी कधी पाहिली नव्हती,” असे ते म्हणाले. त्यामुळे पिकांच्या नुकसानीबरोबरच शेतकरी कुटुंबांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.Sharad Pawar
केंद्र-राज्य सरकारने तातडीची मदत द्यावी
सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, परभणी आणि नगर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशावेळी राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी बजावली पाहिजे, असे पवारांनी ठामपणे नमूद केले. “केंद्र सरकारकडे नैसर्गिक आपत्तीतील मदतीची योजना आहे. त्याचा लाभ घेऊन राज्य सरकारने तातडीने पंचनामे करावेत आणि मदत वितरित करावी,” अशी मागणी त्यांनी केली. पिकं, जनावरे आणि जमीन अशा तिन्ही आघाड्यांवर झालेले नुकसान लक्षात घेऊन व्यापक मदत योजना राबवण्याची आवश्यकता आहे, असे पवारांनी अधोरेखित केले.
पिकांसोबत जमिनीचे आणि रस्त्यांचेही नुकसान भरून काढा
पवारांनी स्पष्ट केले की, पीक वाया गेले तर फक्त त्या वर्षाचे नुकसान होते, पण जमिनीवरील माती वाहून गेल्यास उत्पादन क्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम होतो. त्यामुळे यंदाची मदत केवळ पिकांसाठी न राहता जमिनीच्या पुनर्वसनासाठीही असावी. तसेच अनेक ठिकाणी पाणंद रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, गुरेढोरे वाहून गेल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून सरकारने सर्वंकष मदत द्यावी, असा त्यांचा आग्रह आहे. “फक्त पंचनामे करून थातूरमातूर मदत देऊन भागणार नाही, तर शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी लागेल,” असे पवारांनी म्हटलं.
हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास, शेतकऱ्यांचा पुनर्वसन आराखडा हवाच
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजांवर यंदा अगदी सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आहे. मे महिन्यापासूनच हवामान खात्याने सावधगिरीचा इशारा दिला होता आणि तो खरा ठरला. त्यामुळे सरकारने हवामान खात्याच्या अंदाजांची नोंद घेत पुढील नियोजन केले पाहिजे, असे पवारांनी सांगितले. “काही लोक प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र पाहणीपुरतेच न थांबता तातडीची मदत करणे गरजेचे आहे. शेतकरी राजाला पुन्हा उभं करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे,” अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App