विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व दणका बसल्यानंतर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय दृष्ट्या कोमात गेली होती. आता ती कोमातून बाहेर आली असून शरद पवारांनी “शॅडो कॅबिनेट” नेमून पक्षाचा विस्तार करायचा निर्णय घेतला आहे. पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उरलेल्या नेत्यांना “शॅडो कॅबिनेट” मध्ये समाविष्ट केले असून त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विभागावर विस्ताराची जबाबदारी सोपवली आहे. पण हे उरलेले नेते भविष्यकाळ त्यांच्याकडे राहतीलच याची कोणतीही गॅरंटी पवारांनी दिलेली नाही.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आज झाली. त्या बैठकीची माहिती खासदार अमोल कोल्हे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली. यात पवारांनी “शॅडो कॅबिनेट” नेमून पक्ष विस्तार कसा करायचा देवेंद्र फडणवीस सरकारच्या १०० दिवसांच्या कामावर लक्ष ठेवून त्यातल्या उणिवा कशा शोधायच्या??, याविषयी मार्गदर्शन केले.
शरद पवारांनी नेमलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये राजेश टोपे + जयप्रकाश दांडेगावकर (मराठवाडा), राजेंद्र शिंगणे + अनिल देशमुख (विदर्भ), जितेंद्र आव्हाड + सुनील भुसारा (कोकण), हर्षवर्धन पाटील (पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. याखेरीज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि तरुण नेते रोहित पवार यांचाही पवारांनी कॅबिनेटमध्ये समावेश केला आहे.
महाराष्ट्रात फडणवीस सरकार असल्यामुळे प्रत्यक्ष कॅबिनेट नेमण्यात पवारांचा कुठला सहभाग उरला नाही त्यानंतर त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसपुरती “शॅडो कॅबिनेट” नेमायचा निर्णय घेतला. पवारांनी महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी स्वरा भास्कर हिचा पती फहाद अहमद याची निवड केली. त्याने मुंबईतल्या अणुशक्ती नगर मधून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक हिच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती.
पवारांनी नेमलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये हर्षवर्धन पाटील, राजेंद्र शिंगणे, एकनाथ खडसे यांचा समावेश केला आहे. पण हे तीनही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भविष्यात राहतीलच याची कुठली गॅरंटी नाही. उलट त्यांची पावले भाजपच्या दिशेने आधीच वळल्याच्या बातम्या आल्या आहेत. फक्त भाजप नेतृत्वाने हिरवा कंदील दाखवण्याचा अवकाश आहे, की हे नेते पवारांची साथ सोडून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत पवारांचे फक्त १० आमदार तुतारी चिन्हावर निवडून आले. त्यामुळे पवारांना प्रत्यक्ष महाराष्ट्राचे कॅबिनेट बनवायची संधी मिळाली नाही, पण आता त्यांनी नेमलेल्या “शॅडो कॅबिनेट” मधले नेते तरी त्यांच्याकडे राहतील का??, याविषयी राजकीय वर्तुळातून दाट शंका व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App