विशेष प्रतिनिधी
मुंबई : अदानींच्या समर्थनाचे पवारांचे वक्तव्य देशातले विरोधी ऐक्य जाऊ द्या, पण महाराष्ट्रातल्याच महाविकास आघाडीला सुरुंग!!, हे घडण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी अदानींच्या शेल कंपन्यांचा मुद्दा अजिबात सोडायला तयार नसताना पवारांनी अदानींच्या समर्थनाचे वक्तव्य करणे याचे परिणाम खुद्द पवार आणि काँग्रेस यांना माहिती नसतील, असे समजणे राजकीय भाबडेपणाचे लक्षण ठरेल. पवार काय किंवा काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय, हे सगळेच राजकीय डावपेचात लोणच्यासारखे मुरलेले नेते आहेत. त्यांना अदानींना विरोध करणे आणि समर्थन करणे यातला नेमका भेद समजत नसेल हे शक्य नाही.Sharad Pawar supporting adani may lead to splits in MVA
पवारांचे डावपेच विरोधी ऐक्याला बाधक
तरी देखील पवारांनी अदानींच्या समर्थनाचे वक्तव्य केले आहे, याचा अर्थ त्यांना त्यातून काही विशिष्ट घडामोडींना स्वतःच्या पद्धतीने राजकीय वळण द्यायचे आहे. संपूर्ण देशभर काँग्रेस सह विरोधी ऐक्याच्या गोष्टी ते करत असतात आणि त्याच वेळी त्या ऐक्याला पोषक ठरणारी राजकीय कृती करण्याऐवजी ऐक्याला बाधक ठरणारी कृती ते करताना दिसतात. मग तो सावरकरांचा मुद्दा असो अथवा अदानीचा. पवारांचे राजकीय डावपेच विरोधी ऐक्याला बाधक असेच ठरताना दिसत आहेत.
त्यातही सावरकरांचा मुद्दा हा परसेप्शनचा मानला तर काँग्रेस आणि राहुल गांधींना त्यावर बॅकफूटवर ढकलण्यात पवार काही अंशी यशस्वी झालेत हे खरे, पण म्हणून अदानींच्या मुद्द्यावर पवारांनी मुलाखतीत जे सांगितले आहे, त्याला काँग्रेस आणि राहुल गांधी हे मान तुकवतील ही शक्यता फार कमी आहे आणि हे पवारांना समजत नसेल असे समजणेही कठीण आहे. याचाच अर्थ पवारांना आपल्या वक्तव्यातून नेमकी वेगळी राजकीय घडामोड अपेक्षित आहे, ती नेमकी कोणती??, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
महाविकास आघाडीची राजकीय धोंड
ती राजकीय घडामोडी देशातल्या विरोधी ऐक्यापेक्षा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे. कारण देशपातळीवर सर्व विरोधकांचे ऐक्य घडविणे तसाही पवारांच्या आवाक्याबाहेरचा राजकीय घास आहे. त्यामुळेच महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, महाविकास आघाडी हे आता राजकीय ओझे झाले आहे. भले महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा मराठी प्रसार माध्यमांमधून गाजत असतील, पण राजकीय व्यवहार पाहता ही महाविकास आघाडी टिकवून धरणे हा तीनही घटक पक्षांनी आपापल्या पायावर राजकीय धोंडा पाडून घेण्यासारखेच आहे. अर्थातच पवारांना महाविकास आघाडीची राजकीय धोंड दूर करायची आहे किंवा महाविकास आघाडीच्या दगडा खालून आपला हात काढून घ्यायचा आहे. पण हे थेट जमावे कसे??, हा मुद्दा आहे.
जागा वाटपाची खरी कसोटी
महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रातल्या महापालिका आणि लोकसभा – विधानसभा निवडणुकांचे जागावाटप हा प्रचंड राजकीय डोकेदुखीचा विषय ठरणार आहे. मग अशावेळी जागा वाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी तुटणे हे “पॉलिटिकल परसेप्शन”च्या बाबतीत तीनही घटक पक्षांना घातक ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष जागा वाटपाच्या मुद्द्यावर भांडून एकमेकांपासून दूर गेले, हे नॅरेटिव्ह महाराष्ट्रात तयार झाले, तर त्याचा लाभ शिवसेना – भाजपला होईल हे सांगायला फार मोठ्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करण्याची गरज नाही. पण महाविकास आघाडीतल्या तिन्ही घटक पक्षांना जो तोटा होईल तो अभूतपूर्व असेल. त्यामुळे महाविकास आघाडीचा खोकला सुंठी वाचून कसा घालवावा ही पवारांना जर चिंता असेल तर त्यातून काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व ज्या ज्या मुद्द्यांवर विशिष्ट भूमिका घेऊन उभे राहते त्या मुद्द्यांना खो घालत राहणे आणि काँग्रेसला महाविकास आघाडीतून दूर सारणे दूर सारण्याचा वेगळा प्रयत्न करणे एवढेच पवारांच्या हातात उरते आणि नेमके हेच सुरुवातीला सावरकर मुद्द्यावर आणि आता अदानी मुद्द्यावर पवारांनी घडवून आणल्यासारखे वाटते!!
काँग्रेसला वगळून ठाकरे – पवार युती
पवारांना महाविकास आघाडीपेक्षा शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबरची युती राजकीय व्यावहारिक पातळीवर टिकवणे हे निश्चितच सोयीचे आहे. त्यात जागा वाटपात स्वतःचे वर्चस्व टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. पण काँग्रेस बरोबर मात्र जागा वाटप करताना पवारांच्या नेतृत्वाची निश्चित कसोटी लागणार आहे आणि तिघांच्या जागा वाटपात तसाही होणारा तोटा हा राष्ट्रवादीसाठी आणि पवारांच्या नेतृत्वासाठी घातकच ठरणार आहे. मग अशावेळी परस्पर महाविकास आघाडीला नख लागण्याचे मुद्दे काढणे हा एकमेव मार्ग पवारांपुढे आहे आणि तो अदानींच्या समर्थनाच्या मुद्द्यात पवारांना सापडला असेल तर त्यात नवल नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App