प्रतिनिधी
पुणे – विधान परिषदेच्या आमदारकीवरून राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय हमरी तुमरी होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजू शेट्टींच्या एका विधानवर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांना प्रत्युत्तरही दिले आहे. किंबहुना पवारांनी राजू शेट्टींच्या आमदाराकीचा प्रश्न राज्यपालांच्या कोर्टात अलगदपणे ढकलून दिल्याचेही स्पष्ट होत आहे. sharad pawar says, NCP has recommended MLC for raju shetti, but final call will be taken by governer
एकेकाचे हिशोब चुकते करायला मी समर्थ आहे. राज्यपालांच्या कोट्यातल्या १२ आमदारांपैकी एक जागा स्वाभिमानीला द्यायचे खुद्द शरद पवारांनी कबूल केले होते. मग त्यासाठी एवढी चर्चा कशासाठी…?? आमच्या स्वातंत्र्यावर कोणाला गदा आणू देणार नाही. आमच्यावर कोणी मेहरबानी करत नाही. कुणाच्या मेहेरबानीची आम्हाला गरजही नाही, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केले आहे.
या वक्तव्याला शरद पवारांनी पुण्यात एका कार्यक्रमानंतर प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार म्हणाले की, राजू शेट्टी नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने जी यादी तयार करून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांचे नाव आहे. राजू शेट्टींनी सहकाराच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे.
ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव राज्यपालांकडे आम्ही दिला आहे. त्याचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून अद्याप आलेला नाही. त्यामुळे एकदा आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर, त्या निर्णयाची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना, मला आश्चर्य वाटते की अशा प्रकारची विधाने कशी केली जातात? पण आम्ही आमचे काम प्रामाणिकपणाने केले आहे. राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचे असेल, तर मला त्यावर भाष्य करायचे नाही. पण मी दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतो आहोत.”
शरद पवारांच्या या वक्तव्यातून त्यांनी राजू शेट्टींच्या आमदारकीचा प्रश्न राज्यपालांच्या कोर्टात सरकवून दिल्याचे स्पष्ट होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App