खुंटा केला हलवून बळकट, डोळ्यातून काढले पाणी; अध्यक्षपदी बसविणार आपल्याच मनातली …!!

विनायक ढेरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष अध्यक्ष पदावरून निवृत्तीची घोषणा केली आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अक्षरशः मोठे राजकीय नाट्य घडले. जयंत पाटलांपासून जितेंद्र आव्हाडांपर्यंत सगळे नेते रडले. पण पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि हा ठाम निर्णय जाहीर करताना अजितदादाःनी सगळ्यांना दरडावले!! पण स्वतः शरद पवारांनी घडविलेल्या या सगळ्या राजकीय नाट्यात “खुंटा केला हलवून बळकट, डोळ्यातून काढले पाणी!!” हीच वस्तूस्थिती समोर आली. Sharad Pawar quit as NCP presidentship

शरद पवारांनी आपल्या 55 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक वेळा राजकीय टर्न आणि ट्विस्ट केले. यापैकीच हा एक टर्न आणि ट्विस्ट ठरला.

शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताना एक समिती नेमून टाकली. त्या समितीत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांना नेमले अर्थातच यशवंतराव चव्हाण सेंटर मधले कार्यकर्ते भावूक झाले. अनेकांनी भावपूर्ण भाषणे केली. अंकुश काकडेंना तर, “तुजसाठी जनन ते मरण, तुजवीण मरण ते जनन” अशी सावरकरांची कविता आठवली!! जयंत पाटलांना बोलताना कंठ दाटून आला. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे हेमंत टकले, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे हे सगळे बोलताना प्रचंड भावूक झाले. सर्वांनी शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. शरद पवारांनी देखील दोन शब्द बोलत आपण फक्त अध्यक्ष पद सोडतो आहोत. राष्ट्रवादी नव्हे तिथे आपण कायम राहू, असे स्पष्ट केले.



अजितदादांची दरडावणी

पण या सर्वांच्या भाषणात अजितदादांचे भाषण मात्र सगळ्यात वेगळे ठरले. त्यांनी अनेक वेळा कार्यकर्त्यांना दटावले. हा निर्णय कधी ना कधीतरी घ्यावा लागणारच होता तो पवार साहेबांनी घेतला आहे. पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी. ते सोडून कोणी राष्ट्रवादी नाही हे सांगायला कोणा कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे पवार साहेब आपल्याबरोबरच राहतील आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष काम करेल आणि तो तयार होत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे??, असा दरडावणीयुक्त सवाल अजितदादांनी केला.

पवारांचा निर्णय 1 मे रोजीच

त्याखेरीज अजितदादांनी एक बाब तर उघडपणे सांगितली, की शरद पवारांनी हा निर्णय कालच म्हणजे 1 मे 2023 रोजी जाहीर करायचा निर्णय घेतला होता. पण काल महाराष्ट्र दिन होता. महाविकास आघाडीची वजन मोठ सभा होती पण दिवसभर मीडियामध्ये पवार साहेबांच्या निवृत्तीचीच बातमी चालली असती. त्यामुळे ते टाळून त्यांनी आज दोन मे 2023 हा पुस्तक प्रकाशनाचा दिवस निवडला. मी आत्ताच काकींशी बोललो. त्यांनी स्पष्ट सांगितले, की पवार साहेब निर्णय मागे घेणार नाहीत. अशावेळी आपण तो निर्णय मान्य करून पुढे जायला हवे ,अशी परखड सूचना अजितदादांनी केली.

पण या सर्व राजकीय नाट्यात शरद पवारांनी आपली भूमिका ही सोनिया गांधीं सारखी मार्गदर्शकाची असेल असे सूचित करून पुढची सूत्रे आपण त्यांच्यासारखीच कदाचित सुप्रिया सुळे यांच्या हातात सोपवू, असे “बिटवीन द लाईन्स” सांगितले.

2019 च्या निवडणुकीत साताऱ्याच्या सभेत शरद पवार भिजले होते. त्यांच्या त्या भिजण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय परफॉर्मन्स उंचावला होता. नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वळणे आली आणि त्यामुळे अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या वाट्यामध्ये जाऊन बसली. आता राष्ट्रवादीची सत्ता गेली आहे. महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रवादीला सत्तेवर आणायचे आहे. पण पवारांचे वय त्याला साथ देत नाही. मग अशावेळी स्वतःच एखादी राजकीय खेळी करून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी यावे, असे पवारांना वाटले असल्यास नवल नाही. नेमकी तशीच राजकीय खेळी पवारांनी आज 2 मे 2023 रोजी “लोक माझे सांगाती” या आत्मकथेच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात केली आहे. आज पाऊस तर काही पडला नाही. पण पवारांनी “खुंटा केला हलवून बळकट, इतरांच्या डोळ्यातून काढले पाणी, अध्यक्षपदी बसवणार आपल्या मनातली राणी!!, हे मात्र सिद्ध करून दाखवले आहे!!

Sharad Pawar quit as NCP presidentship

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात