नाशिक : एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण स्वतःच्या बोटावर फिरवण्याचा दावा करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था महापालिका निवडणुकीत एवढी बिकट झाली की पवारांच्या तुतारीला कुणीच कुठे विचारेना, महापालिकांच्या राजकारणात त्यांचा पक्ष फिट बसेना, अशी अवस्था येऊन ठेपली. Sharad Pawar
पवार काका – पुतणे एक होणार अशी नुसतीच घोषणाबाजी झाली. पण मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर सोलापूर, नागपूर या सगळ्या महापालिकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाला कुणीच आपल्या आघाडीत घेईना, असे चित्र समोर आले.
– मुंबईत ठाकरे बंधूंनी विचारलेच नाही
मुंबईत ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली. त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेसशी वाटाघाटी करायचा प्रयत्न केला. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मागितलेल्या 15 – 20 जागा सोडायला सुद्धा काँग्रेस तयार झाली नाही. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते ठाकरे बंधूंच्या निर्णयाकडे आशेने डोळे लावून बसले, पण ठाकरे बंधूंनी सुद्धा पवारांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारले नाही. त्यांनी परस्पर स्वतःची युती जाहीर करून टाकली. जागावाटपाची चर्चा सुरू करून ती अंतिम टप्प्यावर आणून ठेवली यात पवारांच्या राष्ट्रवादीने मागितलेल्या 15 – 20 जागांचा सुद्धा विचार ठाकरे बंधूंनी केला नाही.
पुण्यात काका पुतण्यांची युती फिस्कटली
पुण्यात अजितदादांनी तुतारी सोडा आणि घड्याळ हाती बांधा असा आग्रह धरल्याबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नांगी टाकली. बळकट भाजप समोर लढताना दादांची साथ मिळणार नाही म्हणून पवारांचे नेते हतबल झाले. पण आपण महाविकास आघाडीतून लढू असा निरोप सुप्रिया सुळे यांनी दिल्यामुळे पुण्यातल्या नेत्यांचा नाईलाज झाला म्हणून त्यांना काँग्रेसच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या दारात जावे लागले. पण तिथे सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीची फारशी डाळ शिजली नाही. काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांना हव्या तेवढ्या जागा सोडायची तयारीच दाखविली नाही. त्यामुळे पुण्यात पवारांची राष्ट्रवादी एकाकी पडली.
– कोल्हापुरात तर तिसऱ्या आघाडीने सुद्धा विचारले नाही
कोल्हापूर सारख्या शहरात तर काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना साधा निरोप सुद्धा पाठविला नाही. पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांना अल्टिमेटम देऊन पाहिला, पण तो पवारांच्याच नेत्यांवर उलटला. पण या पलीकडे जाऊन पवारांच्या पक्षाच्या नेत्यांची एवढी गलितगात्र अवस्था झाली की वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी यांच्या तिसऱ्या आघाडीने सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांच्या आघाडीत स्थान दिले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी साठी 50 – 50 लाख रुपये मागितल्याचा आरोप करणारा लेटर बॉम्ब पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टाकला, पण तो फुसका निघाला. कारण काँग्रेसच्या नेत्यांनी या लेटर बॉम्बची आमची साधी दखल सुद्धा घेतली नाही.
– नागपूर, सोलापुरात गोची
नागपूर आणि सोलापूर या दोन्ही महापालिकांमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी स्वतंत्रपणे लढायची घोषणा करून पवारांच्या राष्ट्रवादीची गोची केली. त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना कुठल्या चर्चेचे निमंत्रण दिले नाही किंवा त्यांनी निमंत्रण दिलेल्या चर्चेला प्रतिसाद सुद्धा दिला नाही. पवारांच्या पक्षाची ताकद निवडून आणायची सोडा, कुणाला पाडण्याची देखील उरली नाही.
– नांदेड मध्ये घोडे अडले
नांदेड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढतील अशी घोषणा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली पण तिथे सुद्धा घोडे जागावाटपातच अडले. त्याचा तिढा सोडवण्यासाठी राज्यपातळीवरच्या नेत्यांना वेळही मिळाला नाही.
– शरद पवारांवर काय वेळ आली??
एकेकाळी हेच शरद पवार महाराष्ट्राचे राजकारण बोटावर हलवतो आणि फिरवतो अशा बाता मारत होते. पण प्रत्यक्षात वयाच्या 85 व्या वर्षी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या दारात जायची वेळ आली. ते दारात जाऊन सुद्धा त्यांना कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही. कारण कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना शरद पवारांचा पक्ष महापालिकांच्या राजकारणात फिट बसतो, असे वाटलेच नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App