Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!

नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था सध्या 1980 च्या दशकातल्या चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी झालीय. कारण त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती होत चाललीय. ज्याप्रमाणे 1980 च्या दशकात चव्हाण + रेड्डी काँग्रेस मधून गळती होऊन महाराष्ट्रात इंदिरा काँग्रेसची भरती झाली होती, तसेच पवारांच्या राष्ट्रवादी बाबत घडताना दिसत आहे.

1977 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या पराभव झाल्यानंतर त्यांचे जुने सहकारी असलेल्या यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांना इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचे काँग्रेसमध्ये ओझे वाटायला लागले होते. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली 1971 ते 1977 अशी सत्ता पूर्ण भोगून झाल्यानंतर चव्हाण आणि रेड्डी यांना इंदिरा गांधींचे नेतृत्व लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे वाटू लागले होते. अखेरीस त्यांनी इंदिरा गांधींना पक्षातून निष्कासित केले. आणि त्या काळात विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचे नेतृत्व या दोन्ही नेत्यांनी स्वतःकडे घेतले होते. 1980 च्या लोकसभा निवडणुका यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांच्या काँग्रेसने, (ज्याला लोक “चड्डी काँग्रेस” म्हणायचे) स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. इंदिरा गांधींचे नेतृत्व त्यांनी झुगारून दिले होते.



1980 च्या निवडणुकीचे निकाल पूर्णपणे विपरीत लागले. देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेने इंदिरा गांधींचे नेतृत्व स्वीकारले त्यांच्या इंदिरा काँग्रेस पक्षाला दोन तृतीयांश बहुमत दिले. महाराष्ट्रातल्या जनतेने चव्हाण + रेड्डी काँग्रेस अर्थात “चड्डी काँग्रेस” डब्यात घातली. चव्हाण + रेड्डी काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण हे स्वतः त्यांच्या पारंपरिक कराड लोकसभा मतदारसंघातून कसेबसे निवडून येऊन लोकसभेवर पोहोचले होते.

1980 च्या निवडणुकीत इंदिरा गांधी प्रचंड बहुमतानिशी सत्तेवर आल्यानंतर चव्हाण + रेड्डी काँग्रेस मधले नेते प्रचंड अस्वस्थ झाले. आपला सत्तेचा ऑक्सिजन संपला. चव्हाण आणि रेड्डी आपल्याला तो ऑक्सिजन होऊ शकत नाहीत हे लक्षात येताच या दोन्ही नेत्यांच्या पक्षातून म्हणजेच चव्हाण + रेड्डी काँग्रेस मधून गळती सुरू झाली. त्यातूनच सत्ताधारी इंदिरा काँग्रेसची भरती झाली. शेवटी तर यशवंतराव चव्हाण यांना देखील इंदिरा गांधींपुढे शरणागती पत्करून त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला होता.

आता जेव्हा लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भारी ठरली, तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ओढा वाढला होता. निलेश लंके आणि बजरंग सोनवणे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून खासदारकी मिळवली. पण विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झाली. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीतून उलटा प्रवाह सुरू झाला. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांचा ओढा वाढला. आज सांगलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले शिवाजीराव नाईक, राजेंद्र अण्णा देशमुख, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, रवी तमन घोडा पाटील हे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या आधी नांदेड आणि साताऱ्यात पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती झाली.

याचा अर्थच शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था चव्हाण रेड्डी काँग्रेस सारखी झाली. कारण शरद पवार आता या नेत्यांना सत्तेचा ऑक्सिजन थेटपणे पुरवू शकत नाहीत. त्या ऑक्सिजनच्या नळ्या अजित पवारांच्या हातात आहेत. त्यामुळे शरद पवारांना “दैवत” म्हणून हे सगळे नेते अजितदादांच्या राष्ट्रवादीत दाखल होत आहेत.

Sharad Pawar NCP like Chavan Reddy Congress of 1980

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात