विशेष प्रतिनिधी
शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यावर केंद्रीय राजकीय पातळीवरून फारसा प्रतिसाद आलेला नाही. किंबहुना राहुल गांधी, एम. के. स्टालिन आणि पिनराई विजय वगळता पहिल्या फळीतल्या नेत्यांनी त्याचे अद्याप दखलही घेतलेली नाही, इतकेच काय पण ममता बॅनर्जी, केसीआर चंद्रशेखर राव, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल यांनीही पवारांच्या निवृत्ती नाट्याकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. याचे राजकीय रहस्य वर उल्लेख केलेल्या नेत्यांच्या राजकीय वर्तुणकीत नसून ते दस्तूरखुद्द पवारांच्या अविश्वासार्ह राजकीय व्यवहारात आहे.Sharad Pawar may choose power share in maharashtra rather than futile exercise of opposition unity
पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेबाहेर राहून आता 9 महिने उलटून गेले आहेत. सत्तेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जळाविना मासा त्यामुळे राष्ट्रवादीतली बहुसंख्य नेते सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी, “आम्ही मुख्य प्रवाहाबरोबर गेलो”, हा यशवंतराव चव्हाण यांचा जुना युक्तिवाद त्यांच्या कामी येणार आहे. अशा स्थितीत पवारांचा जर सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्याचा इरादा असेल तर तो पवारांच्या राजकीय स्वभावाशी अत्यंत सुसंगत मानावा लागेल.
पवारांच्या या निवृत्ती नाट्यामागे विरोधकांच्या ऐक्याचे एक सूत्रही दडले आहे. पण विरोधी ऐक्याच्या आळवावरच्या पाण्यामागे लागण्यापेक्षा सत्तेच्या वळचणीला जाऊन बसणे इष्ट, असा पवारांचा होरा आहे.
यामुळेच विरोधी एकजुटीसाठी जे नेते गेल्या सहा – आठ महिन्यांमध्ये शरद पवारांना सिल्वर ओक वर येऊन भेटून गेले आहेत, त्यापैकी एकाही नेत्याने शरद पवारांच्या निवृत्ती नाट्याची साधी दखलही घेऊ नये किंवा त्यावर कमेंट करू नये असे घडले आहे!!
ममता बॅनर्जी, केसीआर चंद्रशेखर राव, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल हे विरोधकांच्या ऐक्याचे मुखर नेते आहेत. गेल्या सहा – आठ महिन्यांमध्ये हे सर्व नेते पवारांना सिल्वर ओक वर येऊन भेटले होते. पवार हे विरोधी ऐक्याचे मार्गदर्शक असल्याचे या सर्वांनी मान्य केले आहे, तरी देखील पवारांच्या निवृत्ती नाट्याला दोन दिवस उलटून गेल्यानंतर यापैकी कोणाही नेत्याने त्या नाट्याची साधी दखलही घेतलेली नाही.
याच्या अनेक कारणांपैकी एक कारण पवारांच्या थेट विश्वासार्हतेशी संबंधित आहे. ज्यावेळी विरोधकांचे ऐक्य मजबूत बांधून केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारवर तुटून पडण्याची गरज असताना नेमकी तीच राजकीय वेळ साधून पवारांनी राष्ट्रवादीत स्वतःचे निवृत्ती नाट्य घडवून आणले. यात त्यांचे ” “पॉलिटिकल कॅल्क्युलेशन” विरोधकांची एकजूट घडविण्यापेक्षा स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील संभाव्य बंडखोरी थोपवून स्वतःच्या कन्येला राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेतेपदी एस्टॅब्लिश करण्याचे आहे.
त्याचवेळी पवार दोन डगरींवर पाय ठेवून उभे असल्याचे चित्र महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात उभे राहिले आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्त करायचे आणि दुसरीकडे अजित पवारांना त्यांच्या आमदारांसह भाजपबरोबर साटे लोटे करायला मोकळेक सोडायचे असा दुहेरी राजकीय व्यवहार शरद पवार करत असल्याचा सर्व विरोधी पक्षांना संशय आहे. किंबहुना पवारांची राजकीय विश्वासार्हताच सर्व विरोधी नेत्यांना प्रचंड संशयास्पद वाटते आहे आणि इथेच ममता बॅनर्जी, केसीआर चंद्रशेखर राव, नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांनी अद्याप पवारांच्या निवृत्ती नाट्याची दखल घेऊन कोणतीही कमेंट न केल्याचे “राजकीय रहस्य” दडले आहे.
पवारांवर भरवसा ठेवून भाजप विरोधात विशेषत: केंद्रातील मोदी सरकार विरोधात कोणतेही पाऊल उचलणे बाकी सर्व खऱ्या मोदी विरोधकांना धोकादायक वाटत असेल, तर त्याला कारणीभूत विरोधकांच्या संशयापेक्षा पवारांची अविश्वासार्हताच अधिक असल्याचे मान्य करावे लागेल.
विरोधी ऐक्य आळवावरचे पाणी
कारण पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसला फार काळ सत्तेबाहेर ठेवून चालणार नाही. अन्यथा ती फुटेल आणि पक्षातले नेतेच आपल्याला सोडून देऊन सत्तेच्या वळचणीला जाऊन बसतील, ही भीती पवारांना आहे. त्याच वेळी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट घडवणे हा तसाही “फ्यूटाइल एक्सरसाइज” आहे. त्यामुळे विरोधकांचे ऐक्य या आळवावरच्या पाण्याच्या मागे लागण्यापेक्षा, सत्तेच्या वळचणीला जाऊन बसणे हे केव्हाही चांगले, असे पवारांना वाटत असेल तर ते त्यांचे “पॉलिटिकल कंपल्शन” आहे.
त्यामुळेच पवार आधी स्वतःचा पक्ष वाचवण्याची खेळी करत आहेत आणि विरोधी ऐक्य जमले तर करू, अशा ते बेतात आहेत. त्यामुळे विरोधकांना पवारांच्या कुठल्याच खेळीवर विश्वास ठेवता येणार नाही. त्याचाच परिणाम म्हणून वर उल्लेख केलेले कोणतेही नेते पवारांच्या निवृत्ती नाट्यावर बोलायला तयार नाहीत. ते सावधपणे परिस्थितीवर नजर ठेवून असावेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App