नाशिक : शरद पवार हे तर भाजपचे हस्तक, या प्रकाश आंबेडकरांच्या आरोपात सत्य किती आणि तथ्य किती??, असे सवाल तयार होण्याचे कारण प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य ठरले.
प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी विरोधकांचे वाभाडे काढले. त्यामध्येच त्यांनी शरद पवार हे भाजपचे हस्तक असल्याचा आरोप केला. शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत. ते भाजपच्या जाळ्यातून बाहेर येऊ शकत नाहीत. शरद पवार, राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यात मोदींना विरोध करण्याची हिंमत नाही. मोदींना खरा विरोध करण्यासाठी नागडं होण्याची गरज आहे, असे परखड वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले.
प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या शरद पवारांच्या वरच्या आरोपांमधले सत्य आणि तथ्य तपासले, तर काही उदाहरणांनी उघड सत्य कुणालाही दिसेल आणि त्यातले राजकीय तथ्य देखील सगळ्यांसमोर उघडे पडेल.
पवारांच्या राजकारणाची उदाहरणे
अगदी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची गोष्ट घेतली, तरी सोनिया गांधींच्या हाता- तोंडाशी पंतप्रधान पद आले असताना शरद पवारांनी परकीय नागरिकत्वाचा मुद्दा उकरून काढून सोनिया गांधी यांच्या विरुद्ध काँग्रेसमध्ये रान पेटविले. त्यातून वाजपेयी – अडवाणींच्या भाजपचा अप्रत्यक्ष फायदाच झाला. भाजपने उचललेला परकीय नागरिकत्वाचा मुद्दा शरद पवारांच्या सारख्या काँग्रेसी संस्कृतीच्या नेत्याने उचलून धरल्याने काँग्रेसची नाचक्की झाली. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पवारांच्या भूमिकेचा अप्रत्यक्ष फायदा झाला.
पण त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत पवारांनी कोलांटउडी मारून सोनिया गांधींच्या काँग्रेसच्या नेतृत्वाशी तडजोड करून महाराष्ट्रात सत्तेची वळचण मिळवली. 2004 ते 14 या काळात शरद पवार स्वतः केंद्र सरकारमध्ये मंत्री राहून काँग्रेसच्या वळचणीला राहिले, याच कालावधीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीला ठेवली. पण स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भरण पोषण काँग्रेसला कुरतडून आणि पोखरूनच केले. परिणामी भाजपला अप्रत्यक्ष बळ मिळत गेले.
2004 ते 2014 या कालावधीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना केंद्रातले कुठलेही मंत्री दारात उभे करत नसताना कृषिमंत्री शरद पवारांनी त्यांना वारंवार मदत केली होती.
न मागताच पाठिंबा
2014 मध्ये पवारांनी भाजपला न मागताच पाठिंबा दिला. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पवारांशी पंगा घेतल्यानंतर फडणवीसांना धडा शिकवण्यासाठी पवारांनी 2019 चा प्रयोग केला. पण या कालावधीत सुद्धा पवारांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी कधीही पंगा घेतला नाही. त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीसांशी पंगा घेतला. पण फडणवीसांनी पवारांचा डाव पूर्णपणे उलटविल्यानंतर मात्र पवारांनी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊ दिली. यात त्यांनी काळाची पावले बरोबर ओळखली.
मोदींशी कधीच पंगा नाही
पवारांनी केंद्रातल्या मोदी सरकारशी खऱ्या अर्थाने कधीच पंगा घेतला नाही. मोदी सरकारने काश्मीर मधले 370 कलम हटविले, त्यावेळी पवारांनी संसदेमध्ये स्वतः त्या विरोधात भाषण केले नाही. त्यांच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्यांना त्यांनी भूमिका मांडायला लावली.
मोदी सरकारनेच आणलेल्या ट्रिपल तलाक आणि waqf सुधारणा कायद्यांना शरद पवारांनी ठाम विरोध केला नाही. या दोन्ही विधेयकांच्या वेळी पवारांनी स्वतः राज्यसभेत भाषणे केली नाहीत. त्या उलट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण जागरूक आहोत, बिल्डरांच्या प्रश्नावर जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी नियमित टप्प्याने मोदींच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांना पत्र लिहिली.
राहुल गांधींनी केलेल्या सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर पवारांनी राहुल गांधींची बाजू उचलून धरण्याच्या ऐवजी भाजपच्या नेत्यांची बाजू उचलून धरली. राहुल गांधींना त्यांनी सावरकरांच्या सामाजिक कार्याविषयी स्पष्ट शब्दांत समजावून सांगितले.
ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानला ठोकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे परदेशांमध्ये पाठवली. त्यामध्ये मोदींनी एका शिष्टमंडळाच्या नेतेपदी सुप्रिया सुळे यांची निवड केली, ती पवारांनी मान्य केली. लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे यांनी मोदींच्या नेतृत्वाची स्तुती केली ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिला आणि फक्त पहलगाम हल्ल्यावरची चर्चा मागितली.
प्रकाश आंबेडकर यांनी आज 7 ऑगस्ट 2025 रोजी शरद पवारांवर ते भाजपचे हस्तक असल्याचा आरोप केला. नेमक्या याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आल्या होत्या.
वर उल्लेख केलेला सगळा घटनाक्रम लक्षात घेतला, तर प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपामधले राजकीय सत्य आणि राजकीय तथ्य ओळखणे महाराष्ट्राच्या जनतेला जड नाही.
अर्थात हे सगळे पवारांनी भाजपचा फायदा व्हावा यासाठी केले, असा कुणी दावा केला, तर तोही चूक आहे. खरंतर पवारांनी वेळेच्या राजकीय नजाकती बरोबर ओळखल्या. स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सगळी खेळ्या केल्या, हेच यातले अधोरेखित राजकीय सत्य आणि तथ्य आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App