नाशिक : रायगड मध्ये शरद पवारांची भाषा पुरोगामी, पण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फरफट ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या दारी!!, अशी अवस्था झाल्याचे समोर आलेय.
रायगड मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला शरद पवार हजर राहिले. तिथे त्यांनी मोठे भाषण केले. महाराष्ट्र आत्तापर्यंत सर्वांना बरोबर घेऊन फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराने चालला. पण महाराष्ट्रात आता फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे सरकार नाही. आजचे राज्यकर्ते त्यांच्या विचारांचे नाहीत. त्यांना बदलायचे असेल आणि महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण पुरोगामी वळणावर आणायचे असेल, तर सगळ्या पुरोगाम्यांनी एकत्र व्हावे. काँग्रेस + राष्ट्रवादी + शेतकरी कामगार पक्ष यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन शरद पवारांनी केले.
पण प्रत्यक्षात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या मागे फरफट झालेली दिसली. ठाकरे बंधूंनी ऐक्य मेळावा घेतला, त्यावेळी माध्यमे फक्त त्यांच्यावरच फोकस ठेवणार हे लक्षात आल्याबरोबर शरद पवारांनी त्या मेळाव्याला हजर राहण्याचे टाळले. पण आपला पक्षच “लाईम लाईट” मधून दूर जाईल याची भीती वाटताच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्याला पाठविले. ठाकरे बंधूंनी सुप्रिया सुळे यांना स्टेजवर स्थान दिले नाही. त्यांना श्रोत्यांमध्ये पहिल्या रांगेत स्थान दिले. भाषणे झाल्यानंतर स्टेजवर बोलावले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी लुडबुड्या आत्याबाईंची भूमिका साकारत आदित्य आणि अमित ठाकरेंना एकत्रितरित्या पुढे केले. पण ठाकरे बंधूंच्या बरोबरीचे स्थान सुप्रिया सुळेंना मिळू शकले नाही.
त्यानंतर आजच्या मीरा-भाईंदरच्या मोर्चा संदर्भात रोहित पवारांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चाला पाठिंबा दिला. परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी देता, मग मराठी माणसाच्या मोर्चाला का परवानगी देत नाही?, असा सवाल त्यांनी फडणवीस सरकारला विचारला.
आत्तापर्यंत शरद पवारांनी केलेल्या राजकारणात मराठी माणसाचा मुद्दा कधी पुढे आणला नव्हता. त्यांनी पुरोगामीत्वाच्या बुरख्याखाली महाराष्ट्रात मराठा राजकारण पुढे रेटले. ओबीसी वगैरे समाज भाषणे करण्यापुरते हाताशी ठेवले. पण कधी मराठी – अमराठी या वादात मराठी माणसाची बाजू त्यांनी उचलून धरलेली दिसली नव्हती. पण आता ज्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले, ते पार रसातळाला जाऊन पोहोचले, त्यावेळी त्यांनी पुन्हा जुनी पुरोगामी भाषा सुरू केली. यातून त्यांनी पुन्हा एकदा मराठा राजकारणाला राजकीय फोडणी द्यायचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्द्याच्या पाठीमागे फरफट झाल्याचे समोर आले. कारण सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना ठाकरे बंधूंचा मराठीचा मुद्दा उचलून धरावा लागला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App