राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या कन्येची राजकीय सेटलमेंट ही शरद पवारांच्या राजकारणाची इतिकर्तव्यता आहे, अशा आशयाचा व्हिडिओ प्रख्यात विश्लेषक भाऊ तोरसेकरांनी केला आहे. या व्हिडिओत त्यांनी दिल्लीस्थित एका मराठी ज्येष्ठ पत्रकाराचा आणि मुंबईतील एका वाहिनीच्या माजी संपादकाचा हवाला देऊन गंभीर विश्लेषण केले आहे. ते जर खरे मानले किंवा त्यात जर तथ्यांश असेल, तर राष्ट्रवादीच्या चाणक्यांचा राजकीय प्रवास यशवंत इच्छा ते नरेंद्र इच्छा व्हाया स्वेच्छा नव्हे, तर इतर बड्यांच्याच इच्छा, असा मानावा लागेल!! Sharad pawar could never be able to manage his own politics as per his own wish!!
कारण शरद पवारांची राजकीय कारकीर्द यशवंतराव चव्हाण यांच्या इच्छेने सुरू झाली, ती आता नरेंद्र मोदींच्या इच्छेबरहुकूम सुरू आहे. “ही तो श्रींची इच्छा”, असे वसंतदादांचे सरकार पाडून शरद पवार 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. वसंतदारांचे सरकार पाडायची यशवंतरावांचीच इच्छा होती. आपण ती फक्त पूर्ण केली, असा हवाला पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर दिला होता. आता तर काहीच दिवसांपूर्वी दस्तुरखुद्द शालिनीताई पाटील यांनी देखील त्यांना लागलेला कलंक पुसला, अशी क्लीन चिट देऊन टाकली आहे. पण ही क्लीन चीट निर्भेळ नाही, तर तिला अजितदादांच्या बंडाची पार्श्वभूमी आहे. पण शालिनीताईंची क्लीन चिट निर्भेळ असो अथवा नसो, शरद पवारांची राजकीय कारकीर्द यशवंतराव चव्हाण यांच्या इच्छेबरहुकूम सुरू झाली ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
मग त्यांनी त्या पुढचे राजकारण असे कितीसे स्वेच्छेने केले, तर ते 5 – 7 वर्षांपेक्षा जास्त भरत नाही. 1980 ते 86 दरम्यान शरद पवार स्वेच्छेने विरोधी पक्षात होते. पण 1986 नंतर ती “स्वेच्छा” संपली आणि ते जे सत्तेच्या वळचणीला जाऊन बसले, ते 2014 पर्यंत त्याच वळचणीला कायम होते. यातली सत्तेच्या वळचणीला कायम राहण्याची इच्छा एवढी वगळता पवारांची राजकीय इच्छा नेहमीच इतर बड्या नेत्यांच्या इच्छेवर अवलंबून राहिली!!
1986 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते राजीव गांधींच्या इच्छेनुसार मुख्यमंत्री झाले. राजीव गांधींच्या निधनानंतर 1991 मध्ये ते पवार पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये आले खरे, पण नरसिंह राव यांच्यासमोर हरल्यानंतर नरसिंह राव यांच्या इच्छेबरहुकूम त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सोडून उपपंतप्रधान पद नव्हे, तर संरक्षण मंत्रीपद स्वीकारावे लागले. मुंबई दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यांना संरक्षण मंत्रीपद सोडून मुंबईत मुख्यमंत्रीपदी परतावे लागले, पण ही देखील पवारांची स्वतःची इच्छा नव्हती, तर ती नरसिंह रावांची इच्छा होती!!
राष्ट्रवादीची स्थापना, पण…
त्यानंतर त्यांनी स्वतःच्या “टर्म्स अँड कंडिशन्स”वर 1999 मध्ये काँग्रेस कडून राष्ट्रवादी काँग्रेस बनविली. पण अवघ्या 6 महिन्यांमध्ये सोनिया गांधींच्या इच्छेबरहुकूम ते पुन्हा काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीला गेले. किंबहुना त्यांना जावे लागले. 1999 ते 2014 पवार सोनिया गांधींच्या इच्छेबरहुकूम केंद्रात आणि महाराष्ट्रात विशेषतः महाराष्ट्रात काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीला होते. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा विधानसभेत जास्त जागा मिळूनही त्यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद खेचून घेता आले नव्हते. उलट ते काँग्रेसला बहाल करावे लागले होते अर्थात ही पवारांचीच इच्छा होती किंवा कसे??, याविषयी साशंकता आहे
पण पवारांची ती इच्छा असो अथवा नसो, ती कधीच स्वयंस्फूर्त किंवा स्वबळावर पूर्ण करण्याची राहिलेली नाही. ती इतरांच्याच किंबहुना त्यांच्यापेक्षा बड्या नेत्यांच्या इच्छेवर अवलंबून राहिली आहे
… आणि आता जेव्हा पवारांच्या हातातून राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे निसटली आहे, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इच्छेबरहुकूम त्यांना आपली राजकीय चाल खेळावी लागत आहे.
मोदींना सुप्रिया सुळे नकोत
वर उल्लेख केल्याप्रमाणे भाऊ तोरसेकरांनी आपल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे खासदार सुप्रिया सुळे यांना आपल्या मंत्रिमंडळात सामावून घ्यायला तयार नाहीत म्हणून पवार भाजपबरोबर जाऊ शकले नाहीत, असा निष्कर्ष काढला आहे. याचा अर्थ देखील पवारांच्या राजकारणाची एकूण दिशा किंवा इतिकर्तव्यता ही मोदींच्या इच्छेवरच अवलंबून आहे, असाच दिसतो.
मग पवारांनी मध्यम मार्ग म्हणून या राष्ट्रवादीचे काय करायचे ते करा आणि तुमचे तुम्ही बघा, असे अजितदादांना सांगून भाजपकडे पाठवले आहे का?? असा सवाल तयार झाला आहे. पण या सवालाचा अर्थही अजितदादांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठविणे ही पवारांची स्वतःची इच्छा असे नसून, ती देखील मोदी – शाहांचीच इच्छा असल्याने अजित दादांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसायला मिळाले आहे, असा आहे.
– भाऊंच्या व्हिडिओ पलीकडले सत्य
पण भाऊंनी व्हिडिओतून जे सांगितले नाही, ते राजकीय सत्य यापेक्षा आणखी वेगळे आहे आणि ते जास्त अचूक आहे, ते म्हणजे मोदी आणि शाह यांना काँग्रेसच्या घराणेशाहीवर जसा तीव्र हल्लाबोल करायचा आहे किंवा ती घराणेशाही जशी मोडून काढायची आहे, तशीच प्रादेशिक पक्षांची घराणेशाही मोदी – शाह मोडू इच्छित आहेत. त्याचे महाराष्ट्रापुरते उदाहरण द्यायचे झाले, तर बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना बाजूला करून त्यांच्या पक्षांचा राजकीय वारसा स्वतःकडे खेचून घेण्याची मोदी – शाहांची इच्छा आणि राजकीय कौशल्य आहे.
याचाही अर्थ असाच की इथेही महाराष्ट्र चाणक्यांची स्वेच्छा नव्हे, तर मोदी – शाहांच्याच इच्छेनुसार त्यांच्या राजकारणाची इतिकर्तव्यता होणार आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App