विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी फुटणार नाही!!, पवार – काका पुतण्या स्वतः बोलले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळेही बोलल्या. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीची चर्चा थांबत का नाही??, हा प्रश्न तयार झाला आहे. कारण दस्तुरखुद्द अजित पवारांनी दुपारी आणि सकाळी स्वतः शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी संदर्भात स्पष्ट खुलासे केल्यानंतरही शिवसेनेच्या शिंदे गटातल्या नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्ये देऊ राष्ट्रवादीतल्या फुटीच्या चर्चेला शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलेल्या इच्छेविरुद्ध जाऊन आणखी फाटे फोडले आहेत. Sharad Pawar, ajit Pawar and supriya sule denied NCP split, but still doubts looms very large!!
तुमच्या जे मनात आहे, ते आमच्या मनात नाही मी जे बोलतो ते महत्त्वाचे आहे. तुम्हाला फाटे फोडण्याचा अधिकार नाही, असे शरद पवारांनी बारामतीच्या शारदा प्रतिष्ठानच्या कुस्ती आखाड्यात पत्रकारांशी बोलताना सुनावले.
त्यानंतर अजितदादांनी देखील मुंबईत आपल्या काही आमदारांसह घेतलेल्या छोटेखानी पत्रकार परिषदेत जीवनाच्या अखेरपर्यंत आपण राष्ट्रवादीतच राहू, अशी ग्वाही दिली. राष्ट्रवादी फुटीची जी चर्चा सुरू आहे, त्या चर्चेत काहीही तथ्य नाही. त्या बातम्यांना काहीही आधार नाही. मी कोणत्याही आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. त्या संदर्भात ज्या प्रसार माध्यमांमध्ये बातम्या आल्या त्या खोट्या आहेत, असे अजितदादांनी स्पष्ट केले. मात्र त्याचवेळी त्यांनी ज्याचे मुखपत्र आहे, त्या पक्षाविषयी बोला. राष्ट्रवादी विषयी बोलायचे काय कारण?, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणला. उद्धव ठाकरे यांनी देखील मी भाजपशी एकटा लढीन, असे वक्तव्य केल्यावरून अजितदादांनी त्यांनाही चिमटा काढला.
पण एकूणच अजितदादांनी घेतलेल्या सर्व पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादी बरोबरच आहोत. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने जीवनाच्या अखेरपर्यंत काम करणार आहोत, असेच सांगितले.
त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील हल्ली जे काही घडते, त्याचे खापर कुठूनही अजितदादांवरच फुटते, अशा शब्दात आपली उद्विग्नता बोलून दाखविली. मला गॉसिप करायला वेळ नाही. लोकप्रतिनिधी म्हणून बरीच कामे आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना सुनावले.
शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्हीही शीर्षस्थ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार नाही. भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्न नाही किंवा अजित पवार भाजपमध्ये जाण्याचाही प्रश्न नाही, असे स्पष्ट खुलासा केले. तरीदेखील राष्ट्रवादीच्या फुटीची चर्चा राजकीय वर्तुळात थांबली नाही. उलट शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, प्रवक्ते नरेश म्हस्के आमदार संजय शिरसाट या नेत्यांनी त्यानंतर वेगवेगळी वक्तव्ये देऊन राष्ट्रवादीमध्ये भविष्यात फूट पडू शकते, असेच स्पष्टपणे सुचित केले.
राष्ट्रवादीत सध्या ढगाळ वातावरण आहे. पण शिवसेना-भाजपचाच पाऊस जोरात पडणार आहे, असे वक्तव्य गुलाबराव पाटलांनी जळगावात केले. शरद पवार जे बोलतात त्याचा नेहमी उलटा अर्थ घ्यायचा असतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असा टोला गुलाबरावांनी हाणला.
अजितदादांची शुगर वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतले ऑपरेशन पुढे ढकलले गेले आहे. पण ते ऑपरेशन कमळ होईल. अजितदादा जुळवाजुळवीसाठी काही वेळ घेत असतील, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. अशाच आशयाचे वक्तव्य आमदार संजय शिरसाट यांनी केले.
एकूण स्वतः शरद पवार अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे राष्ट्रवादीतल्या फुटीचा इन्कार केल्यानंतरही त्या पक्षातली फूट आणि अजितदादांचा भाजपला संभाव्य पाठिंबा या विषयाची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरूच आहे आणि ती थांबायला तयार नाही, हेच या निमित्ताने स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App