नाशिक : महाराष्ट्रातील तथाकथित मतचोरी विरोधात काढण्यात येणाऱ्या सत्याच्या मोर्चाची दुसरी बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झाली. त्या बैठकीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हजर होते. ही बैठक उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली पण ज्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये ही बैठक झाली त्या यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मात्र या बैठकीला हजर नव्हते. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड हे नेते देखील बैठकीला गैरहजर होते. त्यामुळे सत्याच्या मोर्चाची सगळी राजकीय धुरा ठाकरे बंधूंवरच आहे की काय किंबहुना सत्याचा मोर्चा फक्त ठाकरे बंधूंच्या राजकीय फायद्यासाठी काढला जातो की काय??, असा सवाल समोर आला.
जोपर्यंत निवडणूक आयोग मतदार यादी पूर्ण शुद्ध करत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला, पण या बैठकीला शरद पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते हजर नसल्याने तो निर्धार फारच पातळ ठरला. किंबहुना शरद पवार हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूक विरोधाचा निर्धार कायम ठेवू देणार का??, हा सवालही तयार झाला.
– आदित्य ठाकरेंकडून राहुल गांधींची कॉपी
मत चोरीचा मुद्दा राहुल गांधींनी लावून धरला. त्यांनी दोन वेळा प्रेझेंटेशन करून निवडणूक आयोग आणि भाजप या दोघांनाही घेरले. त्यापैकी एक प्रेझेंटेशन राहुल गांधींनी 10 जनपथ वर केले होते तिथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या रांगेत बसून ते प्रेझेंटेशन पाहिले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी परवाच राहुल गांधी यांची कॉपी मारत महाराष्ट्रातल्या मत चोरीचे प्रेझेंटेशन केले त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर महाराष्ट्राचा पप्पू म्हणून टीका केली होती. पण ठाकरे बंधूंनी मत चोरीचा मुद्दा सोडला नाही त्यांनी एक नोव्हेंबर रोजी सत्याचा मोर्चा काढायचे ठरविले.
त्याच्या नियोजनाची दुसरी बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झाली सर्वसाधारणपणे यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये शरद पवारांच्या बैठका होत असतात ज्या खुर्चीवर अध्यक्षस्थानी बसून शरद पवार बैठका घेतात, त्या खुर्चीवर आज उद्धव ठाकरे बसलेले दिसले. त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन मोर्चाची रणनीती ठरविण्यात आली. त्यानंतर सगळ्या पक्षांतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना पत्रकार परिषद घ्यायला सांगून त्या मोर्चाची माहिती देण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानुसार अनिल परब जितेंद्र आव्हाड शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील काँग्रेसचे सचिन सावंत मनसेचे नितीन सरदेसाई, कम्युनिस्टांचे प्रकाश रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोर्चाची माहिती दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App