विशेष प्रतिनिधी
बीड : सरपंच देशमुख यांचे अपहरण ते खून या 4 तासांच्या काळात आरोपी सुदर्शन घुले याने एका बड्या नेत्याला फोन केला होता,अशी माहिती सूत्रांनी दिली. हा बडा नेता कोण हे स्पष्ट झालेले नाही. देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर स्कॉर्पिओत मारहाण केल्याचा व्हिडिओ आरोपींनी तयार केला होता. हा व्हिडिओ सीआयडीला सापडला आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाइलमध्ये हा व्हिडिओ होता.
सीआयडीच्या सूत्रांनुसार देशमुखांच्या हत्येनंतर स्कॉर्पिओ पोलिसांनी जप्त केली होती. या वाहनात फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचे दोन मोबाइल आढळले होते. या दोन मोबाइलमध्ये मारहाणीचे व्हिडिओ होते.
रविवारी सीआयडीने राष्ट्रवादीच्या युवती आघाडी प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची दिवसभर शहर पोलिस ठाण्यात चौकशी केली. संध्या सोनवणे जामखेड (जि.अहिल्यानगर) येथील आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील फरार आरोपींचीह संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. सीआयडीने या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. मात्र, आरोपींना स्वतःचे राहायला घर नाही. त्यांच्या काय मालमत्ता जप्त करणार? असा प्रश्न, सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला. आमचा माणूस गेलाय, तुम्ही माणूस परत देऊ शकत नाहीत. आम्ही फक्त न्याय मागतोय, तो द्या. असे त्यांनी सांगितले.
चॅटप्रकरणी रूपाली ठोंबरेंसह 8 जणांवर गुन्हा
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्रआव्हाड व बीड येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीन शॉट व्हायरल झाला होता. याप्रकरणी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्यासह रेखा फड यांच्यासह एकूण 8 जणांवर बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याने याबाबत तक्रार दिली. आव्हाड यांच्या नावाचा एक व्हॉटस्अॅप स्क्रीन शॉट व्हायरल झाला होता. यामध्ये आव्हाड हे शिवराज नावाच्या व्यक्तीला बोलताना दिसून येते होते. यामध्ये त्यांनी मसाला तयार ठेवा, पैशांची काळजी करू नका यासह मंत्री धनंजय मुंडेंबाबत व अजित पवार यांच्याबाबत एकेरी उल्लेख केलेला होता. दरम्यान, रूपाली ठोंबरे यांनी हा स्क्रीन शॉट त्यांच्या समाजमाध्यमावर टाकून आव्हाडांवर टीका केली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी सायंकाळी पोलिसांत धाव घेतली होती. याप्रकरणी मोहसीन शेख (रा. पुणे)यांच्या तक्रारीवरून रुपाली पाटील ठोंबरे, विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण आघाव, आकाश चौरे व इतरांवर गुन्हा नोंद झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App