नाशिक : बीड जिल्ह्यातले संतोष देशमुख + वाल्मीक कराड + धनंजय मुंडे प्रकरण हे राष्ट्रवादीतल्या सगळ्या जुन्या राजकारणाचा चुथडा; सावरायला आलाय भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या दारा!!, याच शब्दांनी वर्णन करावे लागेल. संतोष देशमुख प्रकरणातले सगळे राजकीय + सामाजिक ताणेबाणे, ताणतणाव, संघर्ष शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीची देन आहे. त्यांच्याच राष्ट्रवादीच्या राजवटीच्या काळात धनंजय मुंडे + वाल्मीक कराड सारख्या राख माफिया प्रवृत्ती जोपासल्या गेल्या. त्यांचे भरण पोषण केले गेले. त्याचे रूपांतर हिंसक राजकारणात झाल्यानंतर आता ते सावरायला मात्र भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या दारात आले.
संतोष देशमुख प्रकरणात ज्या पद्धतीने राजकीय आणि सामाजिक चिखलफेक सुरू आहे. त्याच वेळी मराठा विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष पेटवण्यात येतो आहे, त्या सगळ्यात शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी प्रवृत्तीचेच लोक आहेत. बाहेरचे कोणीच नाहीत. संतोष देशमुख प्रकरणांमध्ये जे सर्वपक्षीय मोर्चे निघत आहेत, त्याला नाव जरी “सर्वपक्षीय” असले, तरी प्रत्यक्षात त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे असे चित्र आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात सगळे मराठा आमदार एकवटले आहेत. सुरेश धस हे जरी आज भाजपचे आमदार असले, तरी ते मूळात राष्ट्रवादीचेच आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये “आका”, “बैल” वगैरे भाषा राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या संस्कृतीतूनच समोर आली आहे.
वाल्मीक कराडचे शरद पवार + सुप्रिया सुळे + रोहित पवार वगैरेंबरोबरचे फोटो पुढे आल्यावर सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी त्या फोटोंचे समर्थनच केले, पण चतुराईने ते सगळे प्रकरण धनंजय मुंडे यांच्यावर ढकलून दिले.
हे सगळे प्रकरण जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या पर्यंत येऊन ठेपत होते, तोपर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते गप्प होते. पण ते प्रकरण अजित पवारांच्या गळ्याशी येऊ लागताच अमोल मिटकरी आणि सुरज चव्हाण प्रवक्ते “ऍक्टिव्ह” झाले, पण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव त्यात ओढायला सुरुवात केली. फडणवीसांनी सुरेश धस यांना गप्प करावे अशा मागण्या केल्या, पण अजितदादांनी या सगळ्या प्रकरणात कारवाई का केली नाही??, या सवालाचे उत्तर मात्र त्यांच्या प्रवक्त्यांनी दिले नाही.
भाजपने अजितदादांना आपल्या महायुतीत घेतल्यामुळे आणि महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांना या सगळ्या प्रकरणाची उत्तरे द्यावी लागत आहेत. अन्यथा अजितदादा जर महायुतीत नसते, तर भाजपच्या प्रवक्त्यांची आणि नेत्यांची या प्रकरणातील सगळी उत्तरे वेगळी झाली असती. किंबहुना भाजपने अत्यंत आक्रमकपणे ते प्रकरण हाताळले असते. राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केले असते, जी खरं म्हणजे आजही करण्याची गरज आहे. किंबहुना आता राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या नाकात वेसण घालून खेचण्याची गरज आहे. महाराष्ट्रात भाजप + शिवसेनेच्या मतदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही मुख्य अपेक्षा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App