मुंबई : Sanjay Raut on Raj Thackeray : हिंदी सक्तीच्या विरोधातील आंदोलनापासून ठाकरे बंधूंमधील अंतर कमी होत असल्याचे दिसत आहे. बऱ्याच दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या दिशेने कोणतीही ठोस पावले उचलली जात असल्याचे दिसत नाही. काही वेळा दोन्ही नेते एकत्र येण्याचे वातावरण तयार होते, तर काही वेळा त्याबाबत कोणतीही शक्यता दिसत नाही.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता वर्तवली जाते. नुकतेच गणपती उत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या घरी गणपती दर्शनासाठी आमंत्रित केले होते. यापूर्वी बेस्ट समितीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे लढा दिला होता, परंतु त्यांना यश मिळाले नाही.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत सकारात्मक वक्तव्य केले होते. यंदाच्या दसऱ्याला कदाचित चांगली बातमी मिळू शकते आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरे यांना आमंत्रण दिले जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले होते.
मात्र, याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “दसरा मेळाव्यात दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत मला काहीही माहिती नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगला संवाद सुरू आहे, हे मी खात्रीने सांगतो. दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे, तर राज ठाकरे यांचा गुढीपाडव्याला स्वतंत्र मेळावा असतो. आमची विचारसरणी मराठी माणसासाठी एकच आहे, पण दोन्ही पक्ष वेगळे आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यात एकत्र येणे शक्य नाही. मात्र, भविष्यात एकत्र येऊन काम करण्याबाबत आमची संमती आहे.”
सचिन अहिर यांच्या वक्तव्यमुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे व्यासपीठावर दिसण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु संजय राऊत यांनी ती फेटाळली आहे.
गेल्या काही काळापासून रखडलेली ठाकरे बंधूंची युती होईल का ? आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढतील का, याबाबत कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App