प्रतिनिधी
मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे उद्या ता. 26 फेब्रुवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसत आहेत. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र, आपल्या उपोषणामागची नेमकी भूमिका काय?, हे संभाजीराजे छत्रपती यांनी एका फेसबुक पोस्ट मधून स्पष्ट केले आहे.Sambhji Raje facebook Post
2017 मध्ये संभाजीराजे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारला मॅनेज झाले, असा आरोप काही राजकीय नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी राजे यांनी केलेला खुलासा राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे.
– खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट अशी :
९ ऑगस्ट २०१७ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे मराठा क्रांती मूक महामोर्चाला हिंसक वळण लागण्याची शक्यता उद्भवली होती. यामुळे जगभरातून नावाजलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चांना गालबोट लागले असते. मराठा समाजाची नाहक बदनामी तर झालीच असती शिवाय समाजाबरोबरच राज्याचेही तितकेच नुकसान झाले असते. इतके होऊनही समाजाच्या हाती काहीच न लागता, तरूणांचे भवितव्यही अधांतरीच राहिले असते. हे सर्व रोखणे गरजेचे होते. मात्र आपले राजकीय भवितव्य धोक्यात घालून मंचावर यायला कुणीच तयार होत नव्हते. यावेळी शासनाकडून आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन घेऊन व मराठा समाजासाठी शासकीय योजना सुरू करण्याचे वचन घेऊन मी आझाद मैदानावरील मंचावर आलो.
मराठा क्रांती मोर्चाच्या मंचावरून कुणालाच बोलण्याची अनुमती नव्हती, त्यामुळे बोलण्यापूर्वी मी उपस्थित समाजबांधवांची तशी अनुमती घेतली व समाजाच्या उग्रतेला शांत केले. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी मी पुढचा मागचा कोणताही विचार न करता मंचावर गेलो. संतप्त असलेला मराठा समाज माझ्या शब्दांवर विश्वास ठेऊन शांतपणे परत गेला. मोर्चाला कोणतेही गालबोट लागले नाही. मात्र अनेकांनी मी मोर्चा मॅनेज केला, तत्कालीन सरकारला मॅनेज झालो, अशा खालच्या स्तरावर जावून टीका केल्या, मला याची पूर्वकल्पना होतीच. मात्र मी केवळ समाजाने माझ्या शब्दांवर दाखविलेला विश्वास डोळ्यांसमोर ठेवला. पुढे तत्कालीन सरकारने मराठा समाजास आरक्षण दिले. समाजाच्या मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी देखील सुरू केली .
आज परत एकदा मराठा समाजाला त्याच मागण्यांसाठी झगडण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजाला बसणारी सामाजिक वर शैक्षणिक क्षेत्रातील अन्यायाची झळ कमी व्हावी, याकरिता समाजाच्या प्रमुख मागण्यांकरिता आम्ही आंदोलन केले. त्यानंतर विद्यमान सरकारने त्या मागण्या मान्य देखील केल्या, मात्र आज आठ महिने उलटले तरी त्या मागण्यांवर कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. समाजाची परिस्थिती “जैसे थे” आहे. मराठा तरुण अन्यायाच्या गर्तेत अडकला आहे. अशावेळी समाजाने माझ्यावर दाखविलेला विश्वास मी नजरेआड करू शकत नाही. म्हणूनच समाजाला वेठीस न धरता, ही माझी जबाबदारी समजून मी स्वतः समाजाच्या या मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत त्याच आझाद मैदानावर दि. २६ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणास बसत आहे…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App