विशेष प्रतिनिधी
बेंगळुरू : औरंगजेब मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्याच परिवारातल्या संघटनांचे कान टोचल्याचे माध्यमांमध्ये चर्चा असली तरी प्रत्यक्षात संघाच्या प्रतिनिधी सभेत बांगलादेशातील हिंदुंवर झालेल्या अत्याचाराबाबत चर्चा आणि पुढील कार्यवाही तसेच संघशताब्दी या विषयांवर अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी व्यासपीठावर दक्षिण मध्यक्षेत्राचे (कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा) क्षेत्र कार्यवाह एन टीप्पेस्वामी, तसेच पत्रकार परिषदेला अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार आणि प्रदीप जोशी उपस्थित होते.
२१, २२ आणि २३ मार्चला येथील जनसेवा विद्या केंद्र परिसरात प्रतिनिधी सभा होत आहे. प्रतिनिधी सभेच्या सुरुवातीला रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे संघाच्या कार्याच्या स्थितीचा अहवाल सादर करतील. त्यानंतर विविध प्रांतांच्या कार्यकर्त्यांकडून देशभरातील उपक्रम आणि कार्यक्रमांचे निवेदन होईल, अशी माहिती श्री. आंबेकर यांनी दिली.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या देशव्यापी प्रवासाचे नियोजनालाही या सभेत अंतिम स्वरूप दिले जाईल, असे आंबेकर यांनी सांगितले. या प्रतिनिधी सभेत ३२ संघप्रेरित संघटना आणि विविध संघटनांचे संघटन मंत्री, सहसंघटन मंत्री सहभागी होतील. त्यात भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष, राष्ट्र सेविका समिती प्रमुख संचालिका शांताक्का, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, अभाविपचे राज शरण, विहिंप अध्यक्ष आलोक कुमार, वनवासी कल्याण आश्रमाचे सत्येंद्र सिंह, विद्या भारती आणि इतर अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतील.
श्री. आंबेकर पुढे म्हणाले, या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. प्रतिनिधी सभेत संघाच्या कार्याच्या विस्तारावर विचारविनिमय होईल. विजयादशमी २०२५ ते विजयादशमी २०२६ हे संघाचे शताब्दी वर्ष साजरे केले जाईल. पंच परिवर्तन- सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण जागरूकता, ‘स्व’ चा बोध आणि नागरिकांची कर्तव्ये यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.
तीन दिवसांच्या बैठकीदरम्यान दोन प्रस्ताव मांडले जाणार आहेत. बांगलादेशातील घडामोडी, हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि पुढील कार्यवाही, संघाच्या शताब्दी वर्षादरम्यानचे उपक्रम आणि पुढील वाटचाल याविषयी हे दोन प्रस्ताव असतील. १५२५ मध्ये जन्मलेल्या शूर योद्धा राणी अब्बक्का यांच्या ५०० व्या जन्मवर्षानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ एक विशेष निवेदन देखील प्रस्तुत करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावर्षी ९५ संघ शिक्षा वर्ग आयोजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App