विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rohit Pawar सिडकोतील तब्बल ५ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “पुरावे द्या” असे खुले आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारत रोहित पवार सोमवारी पत्रकार परिषदेत तब्बल १२ हजार पानांचे दस्तऐवज घेऊन मैदानात उतरले. या पुराव्यांच्या बॅगमुळे शिरसाट यांच्यावरील संकट अधिक गडद झाले आहे.Rohit Pawar
रोहित पवार यांनी या प्रकरणाचे तपशीलवार पुरावे माध्यमांसमोर ठेवले. त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे बिवलकर कुटुंबांचा १९९३ सालचा मूळ अर्ज, सिडकोने चार वेळा फेटाळलेले अर्ज, विधी व न्याय विभागाचा अहवाल, सिडकोचा ठराव आणि सर्वोच्च न्यायालयात दिलेले शपथपत्र यासारखे अनेक ठोस पुरावे आहेत. बिवलकर कुटुंबाने १९९३ मध्ये साडेबारा टक्के योजनेसाठी अर्ज केला होता, पण सिडकोने त्यांचा अर्ज १८ एप्रिल १९९४, त्यानंतर १९९५ आणि २०१० मध्येही फेटाळून लावला होता. विधी व न्याय विभागाच्या अहवालानंतरही सिडकोने नकारात्मक भूमिका घेतली होती. असे असतानाही ही जमीन बेकायदेशीरपणे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले की, “तुम्ही पुरावे मागितले होते, आम्ही बॅग भरून १२ हजार पानांचे पुरावे घेऊन आलो आहोत.” ते पुढे म्हणाले, “जर ५ हजार कोटी रुपयांची फाइल इतक्या सहजपणे फिरू शकते, तर याला भ्रष्टाचारच म्हणायला पाहिजे. या जमिनीची किंमत आता पाच हजार कोटींपेक्षा जास्त असून, ती पुढे बिल्डरांना विकण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू असताना ही जमीन कशी दिली गेली? हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन नाही का? ज्या लोकांनी आता ही जमीन विकत घेतली आहे, त्यांचे पुढे काय होणार? तुम्ही ही जमीन परत घेणार आहात का?, असे सवाल पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केले.
दोन दिवसांत संजय शिरसाटांचा राजीनामा घ्या : रोहित
पवार यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही हल्लाबोल केला. “संजय शिरसाट यांनी सिडकोचे चेअरमन असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला,” असा आरोप त्यांनी केला. शिरसाट यांचा “पैशाची गरज लागली, तर माझी बॅग उघडी आहे” या विधानाचा संदर्भ देत पवार म्हणाले, “अशा भ्रष्ट व्यक्तीला पदावर ठेवू नका. रोहित पवार यांनी गणपती उत्सवापर्यंत शांत राहण्याचा इशारा देत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून ६१ हजार आणि ८ हजार स्क्वेअर मीटरचे भूखंड ताबडतोब थांबवावेत आणि दोन दिवसांत संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.
काय आहे प्रकरण?
बिवलकर कुटुंबीयांनी मराठा साम्राज्याच्या विरोधात ब्रिटिशांना मदत केल्याने त्यांना ४ हजार एकरपेक्षा जास्त जमीन राजकीय इनामात मिळाली हाेती. रोहा, पनवेल आणि अलिबाग, उरण या जिल्ह्यातील १५ गावांत ही जमीन आहे. स्वातंत्र्यानंतर, सरकारने विविध कायदेशीर तरतुदी आणि निर्णयांनुसार सदर जमीन ताब्यात घेतली. २०२४ मध्ये संजय शिरसाट यांची सिडकोचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होताच, त्यांनी पहिल्याच बैठकीत सर्व कायदेशीर निकषांकडे दुर्लक्ष करून या वादग्रस्त जमिनीपैकी सुमारे १५ एकर जमीन बिवलकर कुटुंबाला देण्यास मान्यता दिली. ही जमीन सुमारे ५ हजार कोटी रुपयांची आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App