विशेष प्रतिनिधी
हिंगोली : Banjara Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत ठाण मांडून बसलेले मनोज जरांगे यांचे आंदोलन अखेर सरकारने शांत केले. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून आरक्षण देणारा शासकीय निर्णय (जीआर) सरकारने जारी केला.
मात्र, मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या निर्णयाला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध झाला. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी याविरोधात मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. यानंतर तातडीने हालचाली करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या आश्वासनानंतर ओबीसी समाजाचे आंदोलनही शांत झाल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही आंदोलने शांत झाली असतानाच आता आणखी एका समाजाने आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील बंजारा समाज आता आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे. हिंगोली येथे बंजारा आणि शीख समाजाची संयुक्त बैठक घेऊन याबाबत घोषणा करण्यात आली.
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून आरक्षण दिल्याप्रमाणे बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेटच्या आधारे अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश होऊ शकतो, त्यामुळे सरकारने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी बंजारा समाजाचे धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी हिंगोली येथे केली. तसेच, सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास राज्यातील लाखो बंजारा बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकारसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या या आरक्षणाच्या मागण्यांवर शासन आता काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App