प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे आव्हान कायम असून पोलिसांची नोटीस येऊनही राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार आहे. राणा दाम्पत्याने पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.Rana couple will go to Matoshri despite police notice !!
उद्या सकाळी नऊ वाजता राणा दांपत्य मातोश्रींच्या समोर उभे राहून हनुमान चालीसा वाचणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान दिल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रातले वातावरण तापले आहे. शिवसैनिकांनी मातोश्रीभोवती गर्दी करून राणा दांपत्याचा निषेध केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राणा दांपत्याला त्यांच्या खार निवासस्थानी जाऊन नोटीस बजावली. ही नोटीस राणा दाम्पत्याने स्वीकारली आहे आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपला इरादा बदलला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करू. आम्ही उद्या सकाळी 9.00 वाजता आधीच जाहीर केल्याप्रमाणे हनुमान चालीसा वाचण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू, असे नवनीत राणा आणि रवी राणा यांचे जाहीर केले आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर एकदा नव्हे तर शंभरवेळा हनुमान चालीसा वाचण्याची परवानगी दिली असती, असा टोलाही रवी राणा यांनी लगावला आहे.
मात्र, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्रीबाहेर तसेच राणा दाम्पत्यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांकडून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याला नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मुंबईत राणा दाम्पत्याचे नोटीस देऊन “स्वागत” केल्याचे बोलले जात आहे.
मुंबई पोलिसांची नोटीस
राणा दाम्पत्यांनी कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, असं कुठलंही कार्य करू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून त्यांना 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच मुंबईत शांतता राखण्यासाठी त्यांना आवाहन देखील करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी मंजुनाथ शिंदे यांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App