– पत्रकार स्नेहसंमेलन आणि सत्काराचा हृद्य सोहळा
विशेष प्रतिनिधी
नाशिक : गोदावरी आरतीचे स्वरूप अधिक भव्य करून काशी, प्रयागराज, अयोध्या या तीर्थक्षेत्रांसारखे नाशिकचे ब्रँडिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचा निर्धार रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केला. गोदावरी आरती उपक्रमाच्या वर्षपूर्ती निमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने नाशिक मधल्या पत्रकारांचे स्नेहसंमेलन आणि सत्काराचा हृद्य सोहळा आयोजित केला होता. यामध्ये गेल्या वर्षभरातले अनुभव कथा आणि पत्रकारांशी मुक्त संवाद यांचा समावेश होता. गेल्या वर्षभरात पत्रकारांनी समितीच्या विविध उपक्रमांना दिलेल्या प्रसिद्धी आणि पाठिंब्याबद्दल सेवा समितीने पत्रकारांचा विशेष मानपत्र देऊन सन्मान केला. या सत्कार सोहळ्यास एनालायझर युट्युब चॅनेलचे संपादक सुशील कुलकर्णी आणि द फोकस इंडिया वेब पोर्टलचे संपादक विनायक ढेरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सत्कार सोहळ्याच्या सुरुवातीला रामचरित गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी प्रास्ताविकात सेवा समितीने गेल्या वर्षभरात केलेल्या 400 हून अधिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर सेवा समितीच्या कार्याची व्यापक भूमिका मांडली. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने गोदावरी आरती सुरू नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली आहे. गोदावरी घाटावरचे अर्थकारण पूर्ण बदलून गेले आहे. नाशिककरांनी या आरतीला उस्फूर्त प्रतिसाद देऊन आरती महाराष्ट्रातल्या जनमानसांत पोचविली आहे. इतकेच नाही तर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या आरती उपक्रमातून प्रेरणा घेऊन प्रकाशा आणि धुळे या दोन शहरांमध्ये तापी नदीची आरती देखील सुरू झाली आहे, अशी माहिती जयंत गायधनी यांनी दिली. त्याचवेळी त्यांनी सेवा समितीला सामना करावा लागत असलेल्या समस्यांचाही उल्लेख केला. यामध्ये गोदा घाटावरचे ध्वनी प्रदूषण, नदीच्या पाण्याचे प्रदूषण त्या संदर्भात प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी गोदावरी सेवा समिती महिन्यातल्या पहिल्या रविवारी स्वच्छता उपक्रम करत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
यावेळी पत्रकारांच्या मुक्त संवादात अनेक पत्रकारांनी सेवा समितीला महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्याचबरोबर सेवा समितीच्या उपक्रमांना आणखी प्रसिद्धी देऊन आरती स्वरूप आणि भव्य करण्याचा निर्धारही व्यक्त केला. अनेक संस्था केवळ पत्रकारांचा वापर करून घेतात, पण रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान केला ही दुर्मिळ घटना असल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदविले.
अडचणींचा सामना तर करावाच लागणार आहे, पण तरी देखील सातत्य आणि चिकाटीने गोदावरी आरती उपक्रम सुरू ठेवून रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आणि नाशिककरांनी उत्तम प्रथा परंपरा जपली आहे, अशा शब्दांमध्ये विनायक ढेरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी देखील हेच सूत्र विस्ताराने मांडून गोदावरी सेवा समितीच्या आरतीच्या उपक्रमाच्या निमित्ताने नाशिकचे ब्रँडिंग करण्याची महत्वपूर्ण सूचना केली. कुठलेही वाद संवादातून सोडवता येतील हे खरे. पण त्या पलीकडे जाऊन आपले कार्य चिकाटीने करत राहून ते अधिक मोठे करणे, समोरच्यापेक्षा आपली रेषा वाढविणे हे आपल्या हातात असते. ते आपण करावे. गोदावरी आरतीचे स्वरूप अधिक भव्य कसे करता येईल यावर लक्ष केंद्रित करून आपल्या उपक्रमाचा विस्तार करावा, अशी सूचना सुशील कुलकर्णी यांनी केली. यावेळी त्यांनी प्रयागराज काशी आणि हरिद्वार इथल्या आरती उपक्रमांविषयीचे अनुभव कथन केले. सर्व मतभेद – मनभेद बाजूला सारून गोदावरी आरती विषयी भरपूर सकारात्मक प्रसिद्धी करावी. कारण लोकांना सकारात्मक पाहायला आणि वाचायला आवडते. त्यामध्ये सहभागी व्हायला आवडते. त्यातून जनमताचा प्रचंड रेटा उभा राहतो आणि त्याची भक्कम साथ उपक्रमांना मिळते हे प्रयागराज मध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यातून सगळ्यात जगासमोर आले, याची आठवण सुशील कुलकर्णी यांनी करून दिली. अशीच संधी नाशिककरांना २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने समोर आहे. त्या संधीचा नाशिककरांनी पुरेपूर लाभ उठवावा अशी विनंतीही त्यांनी केली.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सचिव मुकुंद खोचे यांनी गोदावरी सेवा समितीच्या विविध उपक्रमांना नाशिककरांनी आत्तापर्यंत कसा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, याचे सविस्तर वर्णन केले. नाशिक मधल्या ३५० पेक्षा जास्त सेवा संस्थांनी या आरतीमध्ये भाग घेतलाच, पण संपूर्ण हिंदू समाजाच्या एकजुटीच्या दृष्टीने विविध ज्ञाती आणि समाज बांधवांना प्रत्यक्ष गोदावरी आरती करण्याची संधी गोदावरी सेवा समितीने उपलब्ध करून दिली, यासंबंधीची माहिती त्यांनी दिली. गोदावरी आरती केवळ पुरोहितांनी करायचा उपक्रम नसून तो संपूर्ण हिंदू समाजाच्या विविध घटकांनी एकत्र येऊन गोदावरी पूजनाच्या निमित्ताने हा सांस्कृतिक प्रवाह विस्तारण्याचा आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम आहे, अशी विचार मांडणी मुकुंद खोचे यांनी केली.
या हृद्य सोहळ्यासाठी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे उपाध्यक्ष नृसिंहकृपा दास, पत्रकार संपर्कप्रमुख राजेंद्र फड, सन्मान सोहळ्याचे प्रमुख धनंजय बेळे, युवा समितीचे प्रमुख चिराग पाटील, आर्किटेक्ट शैलेश देवी, डॉ. अंजली वेखंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App