प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी देशातील नदी प्रदूषण, यासोबतच राज्यात सुरू असलेला हिंदू-मुस्लिम तणाव, औरंगजेबाच्या कबरीचा वाद यावर भाष्य केले. यासोबतच राज ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.Raj Thackeray
राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे…
…तर आमचा फडणवीसांना पाठिंबा
निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे. होळी संपली. देवेंद्र फडणवीसांच्या हातात एक चांगले आणि सुसंस्कृत राज्य आलेले आहे. याच्याकडे नीट बघा. मराठी माणसासाठी जर चांगल्या गोष्टी करणार असाल तर आमचा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत निश्चितपणे पाठिंबा आहे. पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा, असे म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या राजकारणाची पुढील दिशा जाहीर केली.
मराठा समाजाला आरक्षण का मागावे लागतंय?
आजपर्यंत सर्वात जास्त मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि खासदार हे मराठा समाजाचे होते. पण त्यांनी मराठा समाजासाठी काय केले? समाजाला आरक्षण का मागावे लागतंय? मराठा समाजाला आरक्षण मागावे लागत असेल, तर एवढे आमदार, खासदार आजपर्यंत का निवडून दिले? जात जातीला कधीच सांभाळत नाही. हे फक्त निवडणुकीत तुमची मते घेण्यासाठी जातीचा वापर करतात. यानंतर काही होणार नाही.
कर्ज काढून दिवाळी साजरी का करता?
निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगितले होते ना? काल अजित पवार बोलले, 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका. कर्जमाफी काही होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरा म्हणून सांगत आहेत. लाडक्या बहिणींना देण्यात येणारे पैसे हे वाढवणार असे हे म्हणतात. पण सरकारकडे पैसे आहेत का? कर्ज काढून दिवाळी साजरी का करता? मूळ रोजगाराचे, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत ते पहिला सोडवले पाहिजेत. या मुलांना जातीपातीमध्ये अडकवून राजकारण केले जात आहे.
बीडमधून राखेतून गुंड तयार होतात
संतोष देशमुखांना किती क्रूरपणे मारण्यात आले. पण हे सगळे झाले कशातून? खंडणी आणि राखेच्या पैशातून. बीडमध्ये या घटना घडतात. बीडमधून राखेतून गुंड तयार होतात. वाल्मीक कराडच्या खंडणीला विरोध केल्यानंतर संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख ऐवजी दुसरा कोणी असता, तरीही त्यांनी हेच केले असते. त्यानंतर मराठा आणि वंजारी असा वाद निर्माण केला गेला आणि लोकांना त्यामध्ये गुंतवले जात आहे. यामध्ये वंजारी आणि मराठ्यांचा काय संबंध? हे राजकीय पक्ष त्यातच गुंतवत आहेत. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय कधीच आणणार नाहीत. रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोजगार निर्माण होत नाहीत. पण तरुणांना यांनी जातीच्या राजकारणात अडकवले जात आहे.
धर्माच्या आधारे देश उभा करू शकत नाही
विधानसभेत कित्येक गोष्टी बोलल्या जाऊ नयेत. लाडकी बहीणचे काय झाले? काही नाही. बंद होणार ती योजना. मी निवडणुकीच्या वेळी सांगत होतो. पण माझे खरे सांगून पटले नाही, त्यांचे खोट सांगून पटले. महत्त्वाचे विषय सोडून विधानसभेत चर्चा कशावर तर औरंगजेबावर. धर्माच्या आधारे देश उभा करू शकत नाही हे पहिल्यांदा टर्की या देशाला समजले. त्या ठिकाणी केमाल पाशा आले आणि त्यांनी धर्मावर आधारित सत्ता बाजूला ठेवली. धर्मामुळे देशाची प्रगती होणार नाही, हे त्यांना समजले. टर्की धर्मनिरपेक्ष घोषित करून इस्लामला राज्याचा धर्म म्हणून काढून टाकले. शरिया कायदा बंद करून नवीन कायदा लागू केला. टर्कीला दरवर्षी पाच कोटी पर्यटक भेट देतात. वर्षाला 400 अब्ज डॉलर्स त्यांना उत्पन्न मिळत आहे. हे देश धर्मातून बाहेर पडत आहेत आणि आपण धर्माकडे जातोय, असे राज ठाकरे म्हणाले.
ज्यावेळी लाऊड स्पीकर बंद करा म्हटल्यावर आमच्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल केल्या. सततच्या लाउडस्पीकरचा लोकांना त्रास होतो. तुमचे काही सण असलील तर समजू शकतो. आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आम्ही त्यावर कारवाई करणार. पण पाऊल मात्र उचलले नाही. त्या उत्तर प्रदेशात लाऊड स्पीकर बंद केली. आपण घोषणा केली, पण लाउडस्पीकर त्यांनी बंद केले.
अदाणी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो
महाराष्ट्रातील सर्व तरुण-तरुणींना सांगणे आहे, व्हॉट्सअपवर इतिहास वाचणे बंद करा. ज्यावेळी जातीतून कुणी इतिहास सांगण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळी तो कुठल्या ना कुठल्या पक्षाला बांधील असेल, हे लक्षात ठेवा, असे म्हणत राज ठाकरे यांनी नाव न घेता संभाजी भिडे आणि नीतेश राणे यांच्या विधानाचा समाचार घेतला. फक्त तुमची माथी भडकावण्यासाठी हे उद्योग केले जातात. तुम्ही मराठी म्हणून, महाराष्ट्र म्हणून एक येऊच नयेत, यासाठी सगळे प्रयत्न चालू असतात. मुळात विषय वेगळे असतात. पण हे असले विषय काढून भरकटवले जाते, वेगळीकडे नेले जाते. आम्ही तिकडे बघतो, तेव्हा बाकीचे इकडे काम आटोपून घेतात. मधल्यामध्ये अदाणीला जमीन पण मिळून जाते, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. मुंबईचे विमानतळ, नवी मुंबईचे विमानतळ अदाणीला दिले. पालघरचे बंदरही अदाणीला दिले. अदाणी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो, असे राज ठाकरे म्हणाले.
मराठ्यांनी ज्यांना गाडले त्याची प्रतिके नष्ट करून चालणार नाही
औरंगजेब हा आमचा इतिहास आहे. इतिहास कशासाठी वाचायचा. इतिहासातून बोध घेण्यासाठी वाचायचा. अफजल खान आला. प्रतापगडावर मारला गेला. तिथेच त्याची कबर खोदली गेली. पुरून उरीन जो शब्द आहे ना तो हा आहे. शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय त्याला पुरला नसेल. त्याची कबर केली ते महाराजांनी सांगितले असेल. जगाला कळू द्या कुणाला मारायला आला अन् काय झाले. मराठ्यांनी ज्यांना गाडले त्याची प्रतिके नष्ट करून चालणार नाही. जगाला कळले पाहिजे आपण त्यांना गाडले, असे राज ठाकरे यांनी म्हटले
मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला, असा बोर्ड लावा
औरंगजेब बादशाहचे राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि इकडे बंगाल पर्यंत होते. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून निघाले. त्यानंतर 1674 ला राज्याभिषेक झाला, 1680 ला मृत्यू झाला. त्या दरम्यान औरंगजेबाचा एक मुलगा दक्षिणेत आला त्याला छत्रपती संभाजीराजेंनी बरोबर घेतले, असे राज ठाकरे म्हणाले. औरंगजेब 1681 ते 1707 या 27 वर्ष तो लढत होता. संभाजीराजांना क्रूर पद्धतीने मारले, राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले, महाराणी ताराराणी लढल्या. लेखक नरहर कुरुंदकर म्हणाले, मराठे सर्व लढत हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकत नव्हता. औरंगजेबाला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता, पण ते त्याला जमले नाही, सर्व प्रयत्न करुन इथे मेला. जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो, त्याचा अभ्यास केला जातो. त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळी जगातील लोकांना कळते तो काय करायला गेला आणि कसा मेला. कबर आहे ना. त्या कबरीवरील सजावट काढून तिथे बोर्ड लावा ‘आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला.’ अफजलखान इथे आला त्यावेळी प्रतापगडावर मारला तिथे त्याची कबर खोदली गेली, असे राज ठाकरे म्हणाले.
300 ते 400 वर्षांपूर्वीचा इतिहास त्यावर आम्ही आज भांडतोय
अफजलखानाचा वकील हा कुलकर्णी नावाचा होता, तो ब्राह्मण होता. अफजलखानाशी बोलणी करायला गेलेला शिवाजी महाराजांचा वकील देखील ब्राह्मण होता. त्यावेळी सगळीच माणसे इकडे तिकडे कामाला होती. इतिहासातील प्रत्येक गोष्ट कागदावर लिहिलेली नाही. 300 ते 400 वर्षांपूर्वीचा इतिहास त्यावर आम्ही आज भांडतोय. आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 हजारांची मनसबदारी स्वीकारली होती. परिस्थितीनुसार काही निर्णय घ्यावे लागतात, कशा अंगानं इतिहास पाहायचा असतो ते आपण बघणार आहोत की नाही, असा सवाल राज ठाकरे म्हणाले. औरंगजेबाचा माणूस मिर्झाराजे जयसिंग आला होता, तो राजपूत होता. तानाजी मालुसरेंचा मृत्यू झाला तो उदयभान राठोडाविरुद्ध लढताना, तो राजपूत होता. कोणत्या काळात जगतोय आपण असं राज ठाकरे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App