विशेष प्रतिनिधी
पुणे : राज ठाकरेंचा पहिला झेंडा सर्व रंग समावेशक होता. पण आता तो भगवा झाला आहे. जर भगवाच चढवायचा होता, तर त्यांनी शिवसेना सोडायला नको होती. शिवसेना सोडून त्यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,” अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. मी भाजप सोबत असे पर्यंत मनसे भाजपमध्ये येणे अशक्य आहे. जर असे झाले तर भाजपचा जो नवा मतदार आहे तो नाराज होईल, असेही त्यांनी सांगितले. Raj Thackeray stabbed Balasaheb in the back Statement of Ramdas Athavale
मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा राज ठाकरेंचा नारा हा संविधानाची पायमल्ली करणारा आहे. रिपब्लिकन पक्ष या भूमिकेला कडाडून विरोध करतो. 3 मे रोजी भोंगे उतरविण्याला जाहीर विरोध करत त्या दिवशी सर्व मशिदींच्या भोंग्यांच्या संरक्षणार्थ रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी उभे राहावे, सूचना दिल्या आहेत,असे आठवले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘रिपाइं’ची राज्यस्तरीय बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, “भोंग्याला विरोध करण्याचे काहीही कारण नाही. भगवा हे शांततेचे प्रतीक आहे. जर राज ठाकरेंनी अंगावर भगवा चढवला असेल, तर त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा. त्यांनी कोणाच्या भावना दुखावू नयेत. मंदिरावर भोंगे लावण्यास आमचा विरोध नाही. मात्र मशिदींवरील भोंगे उतरविण्यास आमचा विरोध आहे. त्याचप्रमाणे मौलानांनीही चुकीचे वक्तव्य करू नये. धमकीवजा भाषेचा वापर होणे योग्य नाही. त्यांनी मुस्लिमांना भडकवू नये व मुस्लिम समाजानेही त्यांचे ऐकू नये, असे माझे आवाहन आहे. कुराण शांततेचा मार्ग सांगतो. आपण हिंसेची भाषा करणे साफ चूक आहे.”
“आम्हाला दादागिरी करता येत नाही असे नाही; पण आम्हाला दादागिरी करायची नाही, शांतता हवी आहे. म्हणूनच आम्ही भोंग्यांच्या संरक्षणार्थ उभे राहू. मुस्लिमांनी जर कधी आपल्या सणांना विरोध केला नाही, तर त्यांच्या अजानला विरोध करण्याचे काही कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.
माजी मंत्री अविनाश महातेकर, ‘रिपाइं’चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, नेते राजाभाऊ सरवदे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्क प्रमुख अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, शशिकला वाघमारे, संगीता आठवले, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सरचिटणीस बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले आदी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App