विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असले तरी, अनेक प्रभागांमध्ये आतापासूनच विजयाचा उत्सव सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातील 70 जागी विरोधी उमेदवारांची माघार किंवा एकच उमेदवार रिंगणात उरल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामध्ये महायुतीचे, विशेषतः भाजपचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. या विचित्र राजकीय परिस्थितीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त करत, “उभ्या आयुष्यात मी अशी निवडणूक पाहिली नाही,” असे विधान केले आहे.Raj Thackeray
ठाण्याचे शहराध्यक्ष अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि माजी आमदार राजू पाटील यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, राज ठाकरेंनी महानगरपालिकेतील बिनविरोध विजयावरुन वक्तव्य केले. माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी मी पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण अशी निवडणूक जी इतक्या उमेदवारांना बिनविरोध करते. ही परिस्थिती पहिल्यांदाच मी पाहतोय, असे राज ठाकरे म्हणाले.Raj Thackeray
‘बिनविरोध पॅटर्न’विरोधात मनसे कोर्टात जाणार
दरम्यान, या ‘बिनविरोध पॅटर्न’विरोधात मनसे सोमवारी न्यायालयात धाव घेणार आहे. “उमेदवार कोट्यवधी रुपयांना विकत घेतले असून कोपरीतील आमच्या महिला उमेदवाराला ५ कोटींची ऑफर देण्यात आली,” असा खळबळजनक आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी पुराव्यांसह केला आहे. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
कोपरीतील उमेदवाराला ३० ते ४० वेळा फोन
“कोपरी भागातील मनसेच्या महिला उमेदवाराला पमनानी नावाच्या व्यक्तीने मध्यरात्री जवळपास ३० ते ४० वेळा फोन केले. त्यांना मुलुंड येथे जबरदस्ती भेटायला बोलावलं होतं. उमेदवारी मागे घेण्याकरता त्यांना पाच कोटीची ऑफरही देऊ केले. हवं तर तिथलं सीसीटीव्ही फुटेज चेक करा”, असंही अविनाश जाधव म्हणाले.
राज्यात बिनविरोध पॅटर्न
“राज्यात बिनविरोध पॅटर्न तयार झाला आहे. हा पॅटर्न आता मोडला नाही तर निवडणुकीच्या सहा महिने आधी माणसं दुसऱ्या पक्षात पाठवतील आणि निवडणुकाच होऊ देणार नाहीत. याची चौकशी झाली तर ६४ च्या ६४ ठिकाणी पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. निवडणुकीचा अधिकार प्रत्येकाला आहे. निवडणुकाच होणार नसतील तर मतदान करण्याचा अधिकार मिळणार नाही”, असेही अविनाश जाधव म्हणाले.
आतापर्यंत 70 नगरसेवक बिनविरोध विजयी
बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंत भाजपचे 44 नगरसेवक बिनविरोधी निवडून आले आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाच्या 22 उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2, इस्लाम पार्टीचा 1 (मालेगाव) आणि अपक्ष 1 असे एकूण 70 नगरसेवक महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत.
कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक ‘बिनविरोध’
राज्यात सर्वाधिक बिनविरोध निवडणुका कल्याण-डोंबिवली महापालिकेत झाल्याचे समोर आले आहे. येथे महायुतीचा प्रचंड प्रभाव पाहायला मिळत असून, भाजपचे 15 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
बिनविरोध निवडींवरून राऊतांची टीका
दरम्यान, बिनविरोध निवडींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 60 ते 65 उमेदवार बिनविरोध कसे काय निवडून येतात? हे कोणत्या विकासकामांच्या, कोणत्या लोकहिताच्या कर्तृत्वावर? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपच्या सत्ताकाळातील कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. बिनविरोध निवडी ही लोकशाहीची हत्या असून, मतदारांचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
निवडणूक आयोगावरही राऊतांनी सडकून टीका केली. निवडणूक आयोग म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आयोगाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. बिनविरोध निवडींची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा लोकशाहीवरील विश्वास उडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश
दरम्यान, या बिनविरोध निवडी लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहोचवणाऱ्या आहेत का, याचा तपास करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बिनविरोध विजयी उमेदवाराची अधिकृत घोषणा केली जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
बिनविरोध निवडीमागे विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घ्यायला लावले गेले का, याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. विशेषतः मुंबईसह राज्यातील काही संवेदनशील प्रभागांमध्ये अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले असून नियमभंग आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र उमेदवारांना पुन्हा नामनिर्देशन दाखल करण्याची कोणतीही तरतूद नसल्याने या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App