”कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना..” राज ठाकरेंचा संताप!

”लोकांचे या रस्त्यानी शब्दशः हाल केलेत,काय चाललं आहे महाराष्ट्राचं?”असा प्रश्नही उपस्थित  केला आहे.

विशेष प्रतिनिधी

पनवेल : राज्यभरातील प्रमुख रस्त्यावरील  खड्डयांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. वेळोवेळी हा मुद्दा ऐरणीवर आला परंतु परिस्थिती बदलेलली नाही. याच पार्श्वभूमीवर  काल पनवेल येथे मनसेच्या  निर्धार मेळाव्यातील भाषणातून राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. Raj Thackeray expressed his anguish over the potholes on the roads across the state

राज ठाकरे  म्हणाले, ”आज मी इथं मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरुद्धच्या आंदोलनाला झेंडा दाखवायला आलोय.  कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना.. खड्डे इथे पण दिसले असते आणि खर्च पण वाचला असता. अहो, आपण चंद्रावर जाऊ शकतो पण महाराष्ट्रात रस्ते चांगले बंधू शकत नाही का? २००७ ला मुंबई-गोवा हायवेचं काम सुरु झालं, त्यानंतर इतकी सरकारं आली पण रस्त्याचं काम झालंच नाही आणि तरीही त्याच लोकांना निवडून कसं दिलं जातं? रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय आपल्या मतदारांना काहीच वाटत नाही? फक्त कोकणातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबई ते नाशिक जायला ८ तास लागतात… लोकांचे ह्या रस्त्यानी शब्दशः हाल केलेत. काय चाललं आहे महाराष्ट्राचं?”

याशिवाय ”भारतीय जनता पक्षाने मध्यतंरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिका. त्यांना इतकंच सांगतो की, दुसऱ्यांच्या आमदारांना फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका आणि पक्ष बांधायला शिका. नको ते सल्ले आम्हाला देऊ नका.  लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या आणि धाकावर लोकांना पक्षात घ्यायचं आणि त्यानंतर ती लोकं गाडीत झोपून जाणार. यानंतर “मी तुला दिसलो का? मी होतो का.” म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस नाही का?” असा सवाल  राज ठाकरेंनी विचारला आहे.

याचबरोबर ”अजित पवार म्हणे महाराष्ट्राचा विकास करायला सत्तेत गेलो. काय बोलताय ? पंतप्रधानांनी ७०,००० कोटींच्या घोटाळ्याची आठवण करून दिली आणि हे टुणकन निघाले. बहुधा भुजबळांनी सांगितलं असेल जेलमध्ये काय काय असतं. ते म्हणाले असतील जेलपेक्षा भाजपकडे गेलेलं बरं.  मी नितीन गडकरींना फोन करून सांगितलं की अहो समृद्धी रस्ता करून इतके दिवस झाले पण अजून तुम्ही फेन्सिंग का नाही केलं? रस्त्यावर अनेक प्राणी येत आहेत, त्यांचे अपघात होत आहेत, गाड्यांचे अपघात होत आहेत. इतकी साधी गोष्ट पण सरकारच्या लक्षात येऊ नये ?  आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५,६६६/- कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. मी नितीन गडकरींना विनंती केली होती की तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का?” असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

याशिवाय, ”आधी नाणार मग बारसूच्या प्रकल्पाच्या नावाखाली, कोकणी माणसाच्या हजारो एकर जमिनी कोणी बळकवल्या? ह्याचा शोध घेतलाच गेला पाहिजे. मुंबई गोवा महामार्गावर आजपर्यंत २५०० लोकं मृत्युमुखी पडलेत. अनेकांना दुखणी लागली आहेत, गाड्यांचं नुकसान झालं आहे. तरीही त्याच लोकांना निवडून देत आहेत, त्यामुळे हे पुन्हा पुन्हा निवडून येणारे निवांत आहेत. ते टेंडर, टक्केवारीत व्यस्त आहेत.  जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत. ह्यांनी कोव्हीड पण नाही सोडला. निवडणुकीच्या वेळेस हे पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने भावनिक करून मतं मागतील आणि आमची भोळीभाबडी जनता त्यांना पुन्हा भुलणार असेल तर ह्याच नरकयातना पुन्हा भोगाव्या लागतील.  २०२४ ला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आता सरकार सांगतंय. चांगलंच आहे, हे व्हायलाच हवं. पण पुढे काय? मुंबई-पुणे रस्ता झाला, आणि पुणे पसरत गेलं. घडलं काय तर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणूस हा आक्रसत चालला आहे. हेच कोकणात होणार आहे.
गोव्यात २०२३ चा कायदा आहे की तुम्हाला सहज शेतजमीन घेता येणार नाही. आणि जर घेतली तर तिकडे शेतीच करावी लागली, तिथे इतर उद्योग, हॉटेलं उभारता येणार नाही.गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोव्याचा आम्ही गुरुग्राम होऊ देणार नाही, थोडक्यात उत्तर भारतीयांना जमिनी घेऊन गोव्याची वाट लावू देणार नाही. आणि हे बोलणारा कोण तर भाजपचा मुख्यमंत्री. अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग, त्यावर एकदा छोटं विमान आदळलं, त्याच्याखाली एकदा बॉंम्बस्फोट झाला होता तरीही बिल्डिंग दणकट आहे. ती बिल्डिंग १४ महिन्यांत झाली होती. आणि आपल्याकडे वरळी-वांद्रे सीलिंकला १२ वर्ष लागतात आणि मुंबई गोवा महामार्गाला १६ वर्ष लागली. काय बोलायचं?” असंही राज ठाकरे म्हणाले.

”माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा. सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको पण आंदोलन असं करा की सरकारला धडकी भरली पाहिजे. या आंदोलनंतरही महाराष्ट्र सैनिकांनी जागृत राहावं. कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे पहावं. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाने कोकणाच्या रूपाने जे अद्भुत दान महाराष्ट्राच्या पदरात टाकलं आहे, त्याचं संवर्धन करूया.” असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

Raj Thackeray expressed his anguish over the potholes on the roads across the state

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात