विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला, पण याचा फक्त आनंद साजरा करू नका, तर जबाबदारीचे भान ठेवा. ते गडकिल्ले नीट जपा. गडकिल्ल्यांवरची अनधिकृत बांधकामे पाडून टाका, अशा शब्दांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली. अन्यथा युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कसा काढून घेते, याचे उदाहरणही त्यांनी महाराष्ट्र सरकारला दाखविले.
राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहून या संदर्भात सविस्तर खुलासा केला.
राज ठाकरे यांची पोस्ट अशी :
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. या १२ किल्ल्यांमध्ये ११ किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडू मधला आहे. या निमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहचला होता हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल. या निमित्ताने महाराजांच्या या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा.
एकदा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तूचं संवर्धन, नूतनीकरण याचे खूप कडक निकष असतात ते पाळावे लागतील, पण त्यामुळे किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील. आता राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल आणि राज्याने देखील उत्तम निधी उपलब्ध करून द्यावा. आत्तापर्यंतच्या एकूण एक सरकारांनी गडकिल्ल्यांची जी दुरवस्था करून ठेवली होती त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे, आपल्या महाराजांचं, महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती ती आता बदलेल अशी आशा व्यक्त करतो.
मी, आम्ही हे गेली अनेक वर्षे म्हणत आलो आहे की महाराजांनी उभारलेले किल्ले आणि महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी याचं नीट जतन केलं आणि तिथे पर्यटनासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठच्या कुठे निघून जाईल. असो, फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं, याची आत्तापर्यंतची दोनच उदाहरणं आहेत पण ती आहेत हे विसरू नका. एक उदाहरण आहे ओमान मधल्या आवरिक्स अभयारण्याचं आणि दुसरं उदाहरण आहे ड्रेस्डन व्हॅलीचं… जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीला जागतिक वारसा दर्जा मिळाला पण निकष न पाळल्याने तो २००९ ला काढून घेतला. यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं. तसेच सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका ! त्यात जात – धर्म पहाण्याची गरज नाही ! पुन्हा एकदा मराठी जनतेचं अभिनंदन.
आपला नम्र
राज ठाकरे ।
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App