विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rahul Narwekar कुलाबा वॉर्डातील उमेदवारी अर्जावरून निर्माण झालेल्या वादानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “हा केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित ‘फेक नॅरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न आहे,” असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ज्या महिलेने दबाव टाकल्याचा आरोप केला आहे, तिला आपण कधी पाहिले नाही किंवा भेटलोही नाही. उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी रुपये मागण्याचे ह्या लोकांनी प्रयत्न केले होते, असा आरोपही राहुल नार्वेकर यांनी केला.Rahul Narwekar
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोलिसांवर दबाव टाकर उमेदवारांवर दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी नार्वेकरांवर गंभीर आरोप केले होते, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. यासंदर्भात कुलाबा मतदारसंघातील काही इच्छुक उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता या सर्व प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले आहे.Rahul Narwekar
नेमके काय म्हणाले राहुल नार्वेकर?
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २ जानेवारीला संपली असताना ७ जानेवारीला हे आरोप का केले जात आहेत, असा सवाल नार्वेकरांनी विचारला. “उमेदवारी मागे घेण्याची तारीख उलटून ५ दिवस झाले आहेत. या पाच दिवसांत हे लोक झोपले होते का? की काही विशेष प्लॅनिंग सुरू होते? हे सर्व राजकारण डोळ्यासमोर ठेवून रचलेले नाटक आहे,” असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.
दीपक पवारांवर गंभीर आरोप
नार्वेकर यांनी आरोप करणाऱ्या दीपक पवार यांच्यावरच उलटतपासणी केली. “मी या व्यक्तीची माहिती घेतली आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून नंतर पैसे उकळण्यासाठी उमेदवारांना धमकावणे, हाच यांचा धंदा आहे. लोकसभेतही त्यांच्यावर असेच आरोप होते. ५-५ कोटी रुपये मागण्याचे प्रकार या लोकांकडून झाले असून, त्याबाबत आम्ही लेखी तक्रार आणि खुलासा करणार आहोत,” असा इशारा नार्वेकरांनी दिला.
मला धमकावण्याची गरजच काय?
राहुल नार्वेकरांनी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. “विधानसभा निवडणुकीत मला ५० हजार मतांचे मताधिक्य आहे. वॉर्ड २२५, २२६ आणि २२७ मधूनही मला हजारो मतांची आघाडी मिळाली आहे. ज्याच्या पाठीशी एवढे जनबळ आहे, त्याला कोणाला धमकावण्याची गरज काय? विरोधकांकडे उमेदवार उभे करायला माणसे नाहीत, म्हणून ते असले घाणेरडे प्रकार करत आहेत,” असे स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिले.
कोर्टात जाणे हा प्रत्येकाचा अधिकार
राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्य हर्षिता शिवलकर (मेहुणी), मकरंद नार्वेकर (भाऊ) आणि गौरी नार्वेकर (बहीण) हे कुलाब्यातील तीन वेगवेगळ्या वॉर्डांतून निवडणूक लढवत आहेत. राहुल नार्वेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पोलीस यंत्रणेवर दबाव आणला आणि इतर उमेदवारांना निवडणूक कार्यालयातून बाहेर काढले, असा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “कोर्टात जाणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण कोर्टाने या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. मी कायद्याचा अभ्यासक आहे आणि संविधानाचे रक्षण करण्याचे काम मी सभागृहात व बाहेरही करत आलो आहे,” असे ते म्हणालेत.
उद्धव ठाकरेंची निलंबनाची मागणी
दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत राहुल नार्वेकर यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. तर खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर तोफ डागली होती. एका बाजूला विरोधकांचे गंभीर आरोप आणि दुसरीकडे राहुल नार्वेकरांचा आक्रमक बचाव, यामुळे कुलाब्यातील निवडणुकीला आता कायदेशीर आणि राजकीय संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App