विशेष प्रतिनिधी
मुंबई : Radhakrishna Vikhe Patil मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत हे जरांगे यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चांबाबत मोठा खुलासा केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटीबाबत काहीही चर्चा झाली नाही. तसेच मंत्री उदय सामंत आणि माझ्यातही त्याबाबत काही बोलणे झालेले नाही, असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले आहे.Radhakrishna Vikhe Patil
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांची मनोज जरांगे यांच्यासोबत भेटीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच, मंत्री उदय सामंत यांच्यासोबतही या विषयावर काहीही बोलणे झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, जर आंदोलकांची चर्चेची तयारी असेल, तर सरकारही चर्चेसाठी तयार आहे. परंतु त्यासाठी दोन्ही बाजूंनी समन्वय असणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाबाबत जरांगे पाटलांनी निर्णय घ्यायचा आहे, शासनाची यात कुठलीही भूमिका नाही, सरकारने यापूर्वीही प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला नव्हता आणि आताही नाही, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.Radhakrishna Vikhe Patil
जरांगेंनी चर्चेची तयारी दर्शवल्यास सरकार चर्चेला तयार – उदय सामंत
दुसरीकडे, मंत्री उदय सामंत यांनी देखील मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्याबाबत अजून ठरवलेले नसल्याचे म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी शासनाबरोबर चर्चा करायची तयारी दर्शवली, तर शासन देखील त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे. त्यांच्या चर्चेसाठीच काल आम्ही उपसमितीची बैठक घेतली. शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले. मनोज जरांगे यांनी कोणाबद्दलही गैरसमज करून घेऊ नये. त्यांनी संयमाने सर्व गोष्टी हाताळाव्यात असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले.
पोलिसांची जरांगेंच्या आंदोलनाला सशर्त परवानगी
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे भव्य मोर्चाची सुरुवात झाली आहे. मुंबईत सण काळात आंदोलन होऊ नये, यासाठी मनोज जरांगेंची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मनोज जरांगे यांनी मोर्चा 27 ऑगस्ट रोजीच निघणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. तत्पूर्वी हायकोर्टाने ही परवानगी नाकारल्याने मोठा वाद झाला होता. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांनी आम्ही सरकारच्या सर्व अटींचं पालन करू मात्र उपोषण बेमुदतच करणार, असे म्हटले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App