विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Youth पुण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला नामक तरुणाने भगवे वस्त्र परिधान करत महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणाव निर्माण झाला आहे. सुरज शुक्ला या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, घटनेनंतर कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.Pune Youth
कॉंग्रेसकडून पुतळ्याला दुग्धाभिषेक
कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी अरविंद शिंदे यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. त्यानंतर अरविंद शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया देत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
भाजप सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
अरविंद शिंदे म्हणाले, मागील 12 वर्षांच्या कालावधीत भाजप सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या बाबत सांगायचे झाल्यास काही दिवसापूर्वी भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचे नामांतर करण्यात यावे, हे कशाचे उदाहरण आहे. यातून समाजात केवळ तेढ निर्माण करणे हाच उद्देश आहे, असा आरोप शिंदे यांनी केला आहे.
पुढे बोलताना अरविंद शिंदे म्हणाले, हा उद्देश देशातील जनता कधीही पूर्ण होऊ देणार नाही. पुणे स्टेशन नामांतराची चर्चा थांबत नाही तोवर काल रात्री भगवे वस्त्र परिधान करून सुरज शुक्ला या तरुणाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या विटंबनेच्या घटनेमधून भाजप समाजाला काय संदेश देऊ पाहते, यामुळे आम्ही आज निषेध नोंदवत असून पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. पण या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून यापुढील काळात अशा घटना होणार नाहीत.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास हातात धारदार कोयता घेऊन केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला एक तरुण रेल्वे स्थानकाच्या बाहेर आला. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन तो चौथऱ्यावर चढला आणि पुतळ्यावर कोयत्याने वार करू लागला. पुतळ्याच्या छातीवर आणि पायावर कोयत्याने जोरदार वार करण्यात आले. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी व प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेत सुरज शुक्लाला खाली उतरवून ताब्यात घेतले.
कोण आहे सुरज शुक्ला?
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून काही काळापासून नोकरीच्या शोधत पुण्यात आला आहे. त्याने हे कृत्य कोणत्या हेतूने केले, तसेच तो कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का, याचा तपास रेल्वे पोलिस करत आहेत. त्याची सखोल चौकशी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App