विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घाई कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा मराठी माध्यमांना अधिक झाली आणि त्यांनी वेगवेगळ्या पक्षांमध्ये सुरुवातीला उमेदवारीची अंतर्गत चुरस लावून झाली. पण त्या पलिकडे भाजपशी कायम निष्ठावंत राहिलेल्या गिरीश बापटांच्या “सर्वपक्षीय” महिमा मंडनाचा माध्यमे आणि भाजप सोडून बाकीच्या पक्षांचा कार्यक्रम सुरू आहे. Pune loksabha byelections : NCP’S double standards
जनसंघ ते भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते – नेते
गिरीश बापट हे 1975 ते 2023 आधीच्या जनसंघाचे आणि नंतर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नंतर नेते होते. आपल्या राजकीय आयुष्यात त्यांनी एकदाही पक्षांतर केले नव्हते. तरी देखील पुण्याच्या राजकीय परंपरेनुसार त्यांची सर्वपक्षीयांशी मैत्री होती, ही वस्तुस्थिती आहे. पण म्हणून गिरीश बापटांच्या पक्षनिष्ठेपेक्षा त्यांची “सर्वपक्षीय” मैत्रीची प्रतिमा मोठी होती, हे म्हणणे हा माध्यमांचा आणि राजकीय नेत्यांचा मानभावीपणा आहे!! तो त्यांच्या राजकीय कॅल्क्युलेशनचा भाग आहे.
10 दिवसांचे “पुरोगामी सुतक”
इतकेच नाही, तर आता ज्यावेळी भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या दृष्टीने विशिष्ट चर्चा सुरू झाल्या आहेत, उमेदवारीसाठी स्पर्धा रंगली आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी “पुरोगामी” दृष्टिकोन ठेवून पुण्यातल्या राजकीय पक्षांना सुनावले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढविणार असल्याचे जाहीर केल्यानंतर अजितदादांनी त्यांना गिरीश बापटांचे निधन होऊन तीनच दिवस झाले आहेत, काही जनाची नाही तर मनाची बाळगा असे सुनावले होते. त्यापुढे जाऊन जेव्हा भाजपमध्ये शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची पोस्टर्स भावी खासदार म्हणून लागली, तेव्हा जितेंद्र आव्हाडांनी 10 दिवसांचे सुतक तरी संपू द्या, असे ट्विट केले आहे. जितेंद्र आव्हाड हे “पुरोगामी राजकीय विचारवंत” मानले जातात. त्यांनी ट्विटमध्ये सुतकाचा उल्लेख करणे हेच आश्चर्यकारक आहे. कारण 10 दिवसांचे सुतक वगैरे “प्रतिगामी”, “मनुवादी” “सनातनी” बाबी आहेत आणि जितेंद्र आव्हाडांना गिरीश बापटांचे 10 दिवसांचे सुतक संपण्याची काळजी आहे!!, ही बाब आश्चर्यकारक नाही का??… की हे जितेंद्र आव्हाडांचे गिरीश बापटांसाठी असलेले 10 दिवसांचे “पुरोगामी सुतक” आहे??
राष्ट्रवादीच्या प्रतिक्रिया मूळात अशा का??
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा असो किंवा जितेंद्र आव्हाड, या दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियांचे राजकीय वैशिष्ट्य असे, की मूळात पुणे लोकसभा मतदारसंघ ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची नाही. काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा मूळात काँग्रेसची आहे आणि शिवसेना – भाजपच्या मूळ जागा वाटपात ही जागा भाजपची आहे. त्यामुळे जी काही लढत व्हायची आहे, ती भाजप आणि काँग्रेस यांच्यात होणार आहे. बाकी महाविकास आघाडी वगैरे हे या तोंडी लावण्याच्या बाता आहेत.
१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत .. हाच का तुमचा वेगळे पणा .. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत .. तोवरच तुम्ही बैट पॅड घालून तयार pic.twitter.com/NKLw3l7wVy — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2023
१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत .. हाच का तुमचा वेगळे पणा .. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत .. तोवरच तुम्ही बैट पॅड घालून तयार pic.twitter.com/NKLw3l7wVy
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2023
पुण्यावर कब्जाचा राष्ट्रवादीचा आटापिटा
गिरीश बापटांच्या निधनानंतर महाविकास आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीकडे खेचून घेण्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा खरा हेतू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस वर्षानुवर्षे पुणे लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी आटापिटा आणि धडपड करते आहे. पण मूळात जिथे काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचे जबरदस्त वर्चस्व आहे, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे डाळ शिजणे कठीण आहे. मग भले सुरेश कलमाडींच्या काळात त्यांचा पराभव करून काही काळ अजितदादांनी पुणे महापालिकेवर वर्चस्व जरूर मिळवले असेल, पण पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा सांगण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कधीही यशस्वी ठरलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे!!
त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही एका अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेससाठी कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशाच अवस्थेतली आहे. मग त्या पक्षाच्या नेत्यांनी गिरीश बापटांच्या निधनानंतर काँग्रेस आणि भाजप यांना, जनाची नाही तर मनाची बाळगा किंवा गिरीश बापटांचे 10 दिवसांचे सुतक तरी संपू द्या, असे म्हणणे हे राजकीय मानभावी पणाचे लक्षण आहे!!
याचा अर्थ गिरीश बापटांच्या निधनानंतर काँग्रेस अथवा भाजप यांनी आपल्या अंतर्गत उमेदवारीच्या वादाची धुणी सार्वजनिक चव्हाट्यावर धुवावी किंवा त्यांनी पोस्टर वॉर करावी, असेही नव्हे. त्यांनी आपापसात चर्चा – विचारविनिमय करून तो प्रश्न जरूर सोडवावा. जशी उमेदवारीसाठी चुरस कोणत्याही पक्षात असते, तशीच ती भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे त्या चर्चेत विशेष असे काही नाही. पण या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे “पुरोगामी सुतक” बाहेर आले आहे, हे मात्र निश्चित!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App