विशेष प्रतिनिधी
मुंबई : Supriya Sule राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या गदारोळात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी महायुती तुटत असतानाच पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती फिस्कटल्याने वातावरण अधिकच तापले आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अगदी तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री होतील, असे थेट भाकीत करत त्यांनी शरद पवारांकडून धक्कातंत्र वापरले जाईल, असे संकेत दिले. त्यामुळे महापालिका निवडणुकांपुरती मर्यादित असलेली चर्चा थेट राष्ट्रीय राजकारणापर्यंत पोहोचली आहे.Supriya Sule
महापालिका निवडणुकांमध्ये यंदा अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत असून, राज्यातील 12 हून अधिक ठिकाणी महायुती कोलमडली आहे. भाजप आणि शिवसेना अनेक महानगरपालिकांमध्ये थेट एकमेकांविरोधात उभ्या ठाकणार आहेत. दुसरीकडे, पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. जागावाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे ही युती फिस्कटल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील पाटीलकीमुळे आमचे आणि काँग्रेसचे पटले नाही, असे स्पष्ट करत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे पुण्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.Supriya Sule
युती तुटल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केवळ स्थानिक राजकारणापुरतीच भूमिका मांडली नाही, तर थेट केंद्रातील सत्ताकारणावर भाष्य करत एक मोठा बॉम्ब टाकला. सुप्रिया सुळे लवकरच केंद्र सरकारमध्ये मंत्री होतील, असे भाकीत करत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले. मुंबईत आमची आणि काँग्रेसची युती असल्यामुळे जर कोणी नाराज असेल, तर त्याची आम्हाला पर्वा नाही. आमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे, व्यक्ती नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार कोणता मोठा राजकीय निर्णय घेणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यात काय घडणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यास राज्यातील सत्तासमीकरणांवर मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.
अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये – वडेट्टीवार
या चर्चांना आणखी हवा देणारे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यांनी थेट दावा करत सांगितले की, उद्योगपती गौतम अदानी अलीकडेच बारामतीला येऊन गेले होते. अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार हे लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये, म्हणजेच एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना खासदारांची संख्या वाढवण्याची गरज आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्याकडे आमदारांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे दोघांचे हितसंबंध एकमेकांशी जुळत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. पुण्यात दोन्ही गट एकत्र येणे ही या संभाव्य एकत्रीकरणाची पहिली पायरी असल्याचेही त्यांनी सूचित केले.
मोठ्या राजकीय बदलांची नांदी
या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यात काँग्रेस आणि वंचित युती तुटली असली, तरी ही केवळ स्थानिक आणि तात्पुरती घडामोड आहे की आगामी मोठ्या राजकीय बदलांची नांदी आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकांच्या धुरळ्यात सुरू असलेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील का, शरद पवार एनडीएमध्ये जाणार का, की हे सर्व केवळ राजकीय दबाव तंत्र आहे, याची उत्तरे येत्या काळातच मिळणार आहेत. मात्र, सध्याच्या घडीला तरी महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा निर्णायक वळणावर उभे राहिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App