विशेष प्रतिनिधी
मुंबई : Powai सिनेमांची पंढरी मानली जाणारी मुंबई गुरुवारी पवई परिसरातील ओलीसनाट्याच्या सिनेस्टाइल थराराने हादरली. एका स्टुडिओत वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावलेली १७ मुले, १ वृद्ध आणि १ अन्य व्यक्ती अशा १९ जणांना आरोपीने डांबून ठेवले होते. बचावासाठी आलेल्या पोलिसांनाही त्याने जुमानले नाही. अखेर पोलिसांनी स्वच्छतागृहाच्या खिडकीतून स्टुडिओत प्रवेश केला. आरोपीकडे एअरगन व रसायने होती. या एअरगनने तो हल्ल्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी गोळीबार केला. यात छातीवर डाव्या बाजूला गोळी लागल्याने तो जखमी झाला. यानंतर बालकांची सुखरूप सुटका केली, तर आरोपीचा रुग्णालयात मृत्यू झाला.Powai
महावीर क्लासिक इमारतीतील आरए स्टुडिओमधील ओलीसनाट्याचा थरार पोलिस व एनएसजी पथकाच्या धाडसामुळे सुमारे २ तासांत संपुष्टात आला. या घटनेत ठार झालेल्या ५० वर्षीय आरोपीचे नाव रोहित आर्या हरोळीकर असे आहे. या ओलीसनाट्यादरम्यान एका यूट्यूबवरील व्हिडिओत त्याने स्टुडिओला आग लावण्याची धमकीही दिली होती. या ओलीसनाट्याची माहिती फोनवरून पोलिसांना दुपारी १.४५ वाजता मिळाली. त्यानुसार पोलिस अधिकारी, शीघ्र कृती पथक (क्यूआरटी), एनएसजी, बॉम्बनाशक पथक आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले, असे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. वाटाघाटी होऊ न शकल्याने पोलिसांनी खिडकीतून स्टुडिओत प्रवेश करत आरोपीला घेरून ओलीसनाट्य संपवले.Powai
मुलांच्या सुटकेला प्राधान्य दिले : पोलिस
मोहिमेतून १७ मुले, इतर दोघे बचावले. ही एक आव्हानात्मक कारवाई होती, त्याच्याशी वाटाघाटीचा कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही. मुलांचे जीव वाचवणे ही आमची प्राथमिकता होती,’ असे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे म्हणाले.
आरए स्टुडिओतून मुले जेवणासाठी बाहेर न आल्यामुळे पालकांना चिंता
रोहितने १० ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना एका वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावले होते. त्यानुसार आरए स्टुडिओत गेल्या ५-६ दिवसांपासून मुलांची ये-जा सुरू होती. गुरुवारी मुले जेवणासाठी बाहेर न आल्याने पालकांना चिंता वाटली. त्यातच काही मुलेही खिडकीतून मदतीसाठी आरडाओरड करत असल्याने हा प्रकार उघडकीस आला.
आरोपी पुण्याचा रहिवासी
आरोपी रोहित आर्या हरोळीकर हा पुण्यातील रहिवासी होता. तो प्रोजेक्ट लेट्स चेंज या एनजीओचा संस्थापक व संचालक होता. त्याने २०१३ साली गुजरातमध्ये सुरू केलेला “स्वच्छता मॉनिटर” उपक्रम महाराष्ट्रातही राबवला. तो यूट्यूबरही होता.
पोलिस आल्यावर खरा प्रकार कळला
“गेल्या ३ दिवसांपासून येथे ऑडिशन सुरू होती. आरोपीने ती आणखी ३ दिवसांनी वाढवली. अचानक मेसेज आला की त्याने १७ मुलांचे अपहरण केले आहे. ही मुले जेवणासाठी बाहेर आली नाहीत तेव्हा पालक काळजीत पडले. कदाचित कुणीतरी पोलिसांना फोन केला असेल. पोलिस येथे पोहोचले तेव्हा कळले की मुलांचे अपहरण झाले आहे. पोलिसांनी आत जाऊन मुलांना सुखरूप बाहेर काढले. आता या स्टुडिओची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App