प्रतिनिधी
मुंबई : Yogesh Kadam नागपूर हिंसाचारात पोलिसांवर हात उगारणाऱ्या दंगलखोरांना पोलिसांचा धाक काय असतो हे दाखवून देऊ, असा इशारा राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी बुधवारी विधिमंडळ परिसरात बोलताना दिला. यावेळी त्यांनी जनतेला सोशल मीडियावर हिंसाचाराचे व्हिडिओ व्हायरल न करण्याचेही आवाहन केले.Yogesh Kadam
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून सध्या महाराष्ट्राचे वातावरण तापले आहे. हिंदुत्ववादी संघटनेने या प्रकरणी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन केल्यानंतर सोमवारी रात्री नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली. त्यात तब्बल 33 पोलिस जखमी झालेत. यात 4 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर योगेश कदम यांनी दंगेखोरांना उपरोक्त इशारा दिला आहे.
100 टक्के पोलिसांचा धाक दाखवणार
योगेश कदम म्हणाले, नागपुरात ज्या लोकांनी पोलिसांवर हात उगारले, त्यांना पोलिसांचा धाक काय असतो हे आम्ही 100 टक्के दाखवून देणार. कायदा हातात घेऊन अशी कृत्य करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही. कोणत्याही स्थितीत पोलिसांचे मनोबल ढासळता कामा नये. ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवर हात उगारणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. पत्रकारांनी योगेश कदम यांना नागपुरात जे काही घडले त्यावर सरकारची भूमिका काय? पोलिसांचे मनोधैर्य कसे वाढणार? असा प्रश्न केला होता. त्यावर ते बोलत होते.
व्हिडिओ व्हायरल न करण्याचे आवाहन
योगेश कदम यांनी यावेळी नागपूर हिंसाचाराचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल न करण्याचेही आवाहन केले. हिंसाचाराचे व्हिडिओ व्हायरल करून काहीही साध्य होणार नाही. यामुळे आपणच आपल्या महाराष्ट्राची देशात बदनामी करतो. हे थांबले पाहिजे अशी माझी विनंती आहे. फेसबुक व इन्स्टाग्राम कंट्रोल करता येते, पण व्हॉट्सएपवर व्हायरल होणारे व्हिडिओ कंट्रोल करणे सायबरलादेखील कठीण होते, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र हा पुरोगामीच राहावा -मिटकरी
दुसरीकडे, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. सरकार त्यांना सोडणार नाही. महाराष्ट्र हा पुरोगामीच राहिला पाहिजे. कोणत्याही जाती-धर्मात तेढ निर्माण होऊ नये हा सरकारचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
महिला पोलिसाचा विनयभंग
उल्लेखनीय बाब म्हणजे नागपूरच्या हिंसाचारात जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आल्याची गंभीर बाबही उजेडात आली आहे. त्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी जमावाविरोधात गणेशपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना ही लाजिरवाणी घटना घडली. महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचाही प्रयत्न केला. या ठिकाणी कर्तव्य बजावत असणाऱ्या महिला पोलिसांनाही जमावातून शिवीगाळ व अश्लील शेरेबाजीला सामोरे जावे लागले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App