नाशिक : राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना येवल्याची रेशीम पैठणी शाल आणि जरीत विणलेली स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच प्रतिमा येवल्यातील प्रसिद्ध व्यावसायिक कापसे पैठणीचे संचालक बाळकृष्ण कापसे यांनी भेट दिली. या भेटीची मौलिक आठवण त्यांनी “द फोकस इंडिया”शी बोलताना शेअर केली.PM Modi Modi praise balkrishna kapse and his divyang team for their efforts of weaving skills
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भारतीय वस्त्र खादी आणि रेशीम यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांच्याच मेहनतीने संपूर्ण देशभरातच नव्हे, तर परदेशातही खादी आणि रेशीम वस्त्राचे प्रेम आणि विक्री वाढली आहे त्यामुळे त्याच्या उत्पादनातून लाखो लोकांना रोजगार आणि कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. खादी आणि रेशमाची निर्यात कोट्यावधींची विक्रमी उड्डाणे करून पार गेली आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज येवल्याचे बाळकृष्ण कापसे यांनी भेट घेतली. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राजस्थान सहप्रभारी विजया रहाटकर यांनी विशेष मेहनत घेऊन बाळकृष्ण कापसे यांची पंतप्रधान मोदींशी भेट घडवून आणली. या भेटीत बाळकृष्ण कापसे यांनी पंतप्रधानांना येवल्यातल्या दिव्यांगांनी रेशमात विणलेली पंतप्रधानांची प्रतिमा आणि खास पैठणी शाल देऊन त्यांचा सत्कार केला.
महात्मा गांधी शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः चरख्यावर सूत कातत आहेत, अशी प्रतिमा येवल्यातील दिव्यांगांनी रेशमात विणली आहे.
यावेळी पंतप्रधानांनी बाळकृष्ण कापसे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. इतकेच नाही तर येवल्यातल्या दिव्यांगांनी विणलेल्या त्या प्रतिमेचेही प्रशंसा केली. बाळकृष्ण कापसे यांनी येवल्यात 200 ते 250 दिव्यांगांना प्रशिक्षण देऊन आपल्या केंद्रात रोजगार दिला आहे. पंतप्रधान कौशल्य विकास निधीतून हे रोजगार केंद्र त्यांना मिळाले आहे आणि त्याचा सक्षमतेने ते वापरही करत आहेत.
आज राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या निमित्ताने आपले दैवत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून रेशमातली त्यांचीच प्रतिमा आणि खास रेशमी शाल भेट दिल्यावर बाळकृष्ण कापसे अतिशय भारावून गेले. त्यांनी आपल्या भावना “द फोकस इंडिया”शी बोलताना व्यक्त केल्या.
बाळकृष्ण कापसे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी दैवत मानतो. त्यांच्यासाठी मी “कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः” हा श्लोक दररोज म्हणतो. कारण देशाचे रक्षण जो करतो, त्यांचे रक्षण व्हावे अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. तेच दैवत आज मला प्रत्यक्ष भेटले, याचे मला अत्यंतिक समाधान वाटले. पंतप्रधान मोदींनी माझ्याशी चार – साडेचार मिनिटे मराठीतून संवाद साधला. माझ्या खांद्यावर हात ठेवून अत्यंत आपुलकीने त्यांनी माझ्या व्यवसायाची कुटुंबाची आणि माझ्या सहकाऱ्यांची चौकशी केली. दिव्यांगांनी विणलेली आपलीच प्रतिमा बघून ते स्वतः खूप भारावून गेले. माझ्या केंद्रातून 200 ते 250 दिव्यांगांना रोजगार मिळतो ही कहाणी त्यांना खूप आवडली. त्यांनी या दिव्यांग कलाकारांचीही मुक्तकंठाने प्रशंसा केली. मोदींसारख्या आपल्या दैवताकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळणे ही माझ्यासाठी आज अत्यंत मोलाची आठवण आहे. यावेळी माझी मुलगी सौम्या कापसे ही देखील माझ्याबरोबर होती. तिचेही पंतप्रधानांनी विशेष कौतुक केले.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांनी माझी पंतप्रधान मोदींशी भेट व्हावी म्हणून स्वतः प्रयत्न केले. पंतप्रधान कार्यालयाशी त्या बोलल्या. मला पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून त्यांनी आग्रह धरला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज माझ्या दैवताची प्रत्यक्ष भेट घेण्याचा लाभ मला झाला. भविष्यकाळात आणखी जोमाने काम करण्यासाठी मला पंतप्रधान मोदींच्या भेटीतून ऊर्जा मिळाली. हे काम असेच पुढे चालू ठेवण्याची प्रेरणा हा माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे, अशा भावपूर्ण शब्दांमध्ये बाळकृष्ण कापसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App