मोदींना इंदिराजींचे राजकारण समजले, पण त्यांच्या नातवाला आणि काँग्रेसी डीएनए असलेल्या पक्षांना ते का नाही पचले??, असा सवाल करण्याची वेळ इंदिरा गांधींच्या नातवाने आणि त्यांच्या अनुयायांनींच आणली आहे. PM Modi followed Indira Gandhi’s inclusive politics, but rahul gandhi and sharad pawar following same old fragmented casteist politics
विशेषतः इंदिरा गांधींचे 1971 नंतरचे आणि 1980 नंतरचे राजकीय सर्वसमावेशी राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीट समजून घेतले. त्यातली काही तत्त्वे स्वतःच्या राजकारणासाठी देखील अनुसरली. पण ही तत्त्वे इंदिरा गांधींच्या नातवाला आणि काँग्रेसची डीएनएचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांना ती अवलंबता आलेली नाहीत. त्यामुळेच त्यांचे राजकारण आज जातीच्या कर्दमात जास्तीत जास्त खोल रूतत चालले आहे.
मोदींनी सत्ताधारी भाजपची पूर्ण राजकीय कूस बदलली आहे. ती बदलताना त्यांनी इंदिरा गांधींचे 1980 च्या दशकातल्या राजकारणाचे सूत्र अवलंबले आहे. इंदिरा गांधींनी 1980 च्या दशकात दुहेरी राजकारण साधले. 1985 च्या काँग्रेस शताब्दीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व जुन्या जाणत्या काँग्रेस जणांना एकजुटीचे आवाहन करून आपल्या इंदिरा काँग्रेसमध्ये सामावून घेतले आणि त्याचवेळी त्यांनी वेगवेगळ्या राज्यातील वर्चस्ववादी समाजांच्या प्रस्थापित नेतृत्वांना धक्के देखील दिले.
1980 नंतर इंदिरा गांधींनी तब्बल 200 नेत्यांना वेगवेगळ्या पक्षांमधून फोडून इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. यातल्या फक्त यशवंतराव चव्हाण आणि कृष्णचंद्र पंत या दोन नेत्यांना त्यांनी नावापुरती राजकीय पदे दिली. यशवंतराव चव्हाण यांना आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष नेमले. बाकी सर्वांना त्यांनी दीर्घकाळ काँग्रेसचे चार अणे सभासद ठेवले. याचा दाखला ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावलांनी त्यावेळच्या इंडिया टुडेच्या लेखात दिला आहे. (त्यावेळी काँग्रेसचे सदस्यत्व चार अणे भरून अर्ज करून मिळत असे.)
पण महाराष्ट्रात मात्र इंदिरा गांधींनी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या समर्थक प्रस्थापित मराठा नेत्यांना पराभूत करून धक्का दिला. सहकार क्षेत्रातले यशवंतराव समर्थकांचे वर्चस्व इंदिरा गांधींनी मोडीत काढले. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसे काही स्थानच शिल्लक ठेवले नाही. अब्दुल रहमान अंतुले, बाबासाहेब भोसले यांच्यासारखे नव नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी त्यांनी प्रस्थापित असणाऱ्या वसंतदादा पाटलांचा पुरेपूर उपयोग करून घेत सहकार क्षेत्रातील यशवंतराव समर्थक प्रस्थापित नेत्यांचे राजकारण संपुष्टात आणले.
प्रस्थापित मराठ्यांना पहिला इंदिरा हादरा
1980 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणुकीची नेमकी आकडेवारी बघितली, तर ही बाब व्यवस्थित लक्षात येते. इंदिरा गांधींनी इंदिरा काँग्रेसमध्ये तिकीट वाटपाचे सर्वाधिकार अब्दुल रहमान अंतुले आणि प्रेमालाकाकी चव्हाण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री यांच्याकडे दिले आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रस्थापित मराठा नेतृत्वाला हादरा बसवणारे तिकीट वाटप केले. इंदिरा काँग्रेसने प्रस्थापित मराठा नेतृत्वाला फक्त 30 % तिकिटे वाटली. 70 % तिकिटे ओबीसी समजला जाणाऱ्या छोट्या समाजसमूहाच्या नेत्यांना अल्पसंख्यांकांना वाटली. नुसत्या तिकीट वाटपातून प्रस्थापित नेतृत्वाला धक्का देऊन इंदिरा गांधी थांबल्या नाहीत, तर ज्या चव्हाण – रेड्डी काँग्रेस मधून प्रस्थापित मराठा नेतृत्वाला पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांनी केला होत, त्या चव्हाण – रेड्डी काँग्रेसचा इंदिरा काँग्रेसने जबरदस्त पराभव केला होता. 288 पैकी चव्हाण – रेड्डी काँग्रेसच्या वाट्याला फक्त 47 जागा आल्या. इंदिरा काँग्रेसने 186 जागा जिंकल्या होत्या.*
महाराष्ट्रात इंदिरा गांधींनी इंदिरा काँग्रेसच्या रूपाने पूर्णपणे नवे नेतृत्व प्रस्थापित करून दाखवले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांची इंदिरा काँग्रेसमध्ये राजकीय फरफट झाली हा इतिहास आहे.
पण यातले राजकीय सामाजिक तत्त्व नीट लक्षात घेतले, तर इंदिरा गांधींना 1980 नंतर महाराष्ट्रात प्रस्थापित मराठा नेतृत्व हादरवून सोडायचे होते आणि ते त्यांनी पक्के साध्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांकडे नेतृत्व देताना नेमके याचेच अनुकरण केले.
शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या प्रस्थापित मराठा नेतृत्वाला नरेंद्र – देवेंद्रांनी बाजूला करून एक तर भाजपमध्ये आणले किंवा जे आले नाहीत त्यांना पराभूत करून दाखवले. महाराष्ट्रातल्या प्रस्थापित मराठा नेतृत्वाला पराभूत करताना नरेंद्र – देवेंद्र या जोडगोळीने इंदिरा गांधींचे सर्वसमावेशक राजकारण अवलंबले. त्यांनी महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जातीय आधारावरच बोलायचे झाले तर ओबीसी वर्गाचा प्राधान्य क्रमाने विचार केला. भाजपच्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादाचे ते वैशिष्ट्य ठरले.
आजकाल चर्चेत असलेले मराठा आरक्षण आंदोलन ही भाजपच्या या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी राजकारणाला प्रस्थापित मराठा नेतृत्वाने दिलेले आव्हान आहे. मात्र तसे आव्हान यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळचे महाराष्ट्रातले प्रस्थापित नेतृत्व इंदिरा गांधींना देऊ शकले नव्हते.
विस्कळीत मराठा नेतृत्व
पण नरेंद्र – देवेंद्र सर्वसमावेशक हिंदुत्ववादी राजकारणाला शरद पवारांच्या नेतृत्वाखाली प्रस्थापित मराठा नेतृत्वाने जरी आव्हान दिले असले, तरी हे आव्हान मात्र एक प्रकारे विस्कळीत मराठा नेतृत्वाचे प्रतिक ठरले आहे. कारण एकतर त्यातून शरद पवारांसारख्या बड्या नेत्याला महाराष्ट्राचे सर्वसमावेशी नेतृत्व सोडून एका जातीचे नेतृत्व स्वीकारावे लागले आहे. किंवा त्यांची तशी प्रतिमा तयार झाली आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा पवारांच्या नेतृत्वाखाली एकसंध उभा राहिल्याचे चित्र देखील निर्माण होऊ शकलेले नाही. कारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांचे नेतृत्व हे मराठा जातीचे नेतृत्व म्हणून पुढे आले आहे आणि त्यात सर्वपक्षीय विरोधाचा एक “अंडर करंट” आहे. त्यात मनोज जरांगेंचा कल शरद पवारांकडे झुकला असल्याचे मान्य केले तरी त्यातून सर्वस्वी राजकीय लाभ फक्त पवारांनाच होईल, त्यात कोणी वाटेकरी नसतील, असे मानणे भाबडेपणाचे ठरणार आहे.
उलट त्यातून मराठा आरक्षणासारखा प्रश्न सुटला तरी प्रस्थापित मराठ्यांच्या एकमुखी नेतृत्वाचा प्रश्न मात्र राजकारणात उभा राहणार आहे. मराठा – मराठेतर राजकीय – सामाजिक दरी रुंदावणार आहे. याचा अर्थ मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी राजकारणाला प्रत्युत्तर देताना पवारांना एकजातीय राजकारण तर करावे लागलेच, पण ते उभे करताना देखील मराठा नेतृत्व मात्र विस्कळीत झाल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाल्याचे पाहावे लागले.
इंदिरा गांधींची शिकवण
खरंतर काँग्रेसी डीएनए असणाऱ्या राजकीय पक्षांना इंदिरा गांधींनी 1980 च्या दशकात खऱ्या अर्थाने राजकीय – सामाजिक परिवर्तनाचा ढाचा तयार करून दिला होता. सर्वसमावेशक राजकारणाचा एक चेहरा मोहरा उभा करून दाखविला होता. समाजातल्या प्रत्येक घटकाला एकाच वेळी न्याय देता येणार नाही, पण तसा आभास तर नक्की निर्माण करता येऊ शकेल आणि त्याचवेळी प्रस्थापित नेतृत्वाला धक्का देता येऊ शकेल, ही राजकीय शिकवण इंदिरा गांधींनी काँग्रेसी डीएनए असलेल्या पक्षांना दिली होती. पण ही शिकवण ना त्यांचे नातू आत्मसात करू शकले, ना काँग्रेसी डीएनएचे पक्ष!!… म्हणून त्यांची आज एकजातीय राजकारणाच्या दिशेने वाताहत होत चालली आहे.
मोदी मात्र हिंदुत्वाला सर्वसमावेशकत्वाचे स्वरूप देऊन भारताचे राजकारण सावरकरी हिंदुत्वाच्या दिशेने घेऊन पुढे चालले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App