प्रतिनिधी
मुंबई : इर्शाळवाडीच्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर शिंदे – फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. बुधवारी रात्री 11.00 वाजण्याच्या सुमारास इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळली, यामध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे, अजूनही घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी इर्शाळवाडीला भेट दिली, त्यानंतर त्यांनी विधानसभेमध्ये आज निवेदन केले. Permanent resettlement of citizens in landslide-prone areas of Maharashtra
इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत आज झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे, अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली, त्यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत राज्य शासनाने जाहीर केले असल्याचे त्यांनी सांगितले. आज सकाळपासून इरशाळवाडी येथे शोध कार्यास सुरूवात झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
एवढ्या उंचावर साहित्य, साधनासामुग्री घेऊन जाणाऱ्या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना सलाम करतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीर असल्याची ग्वाही दिली. मात्र यंत्रणा, साधने असूनही प्रतिकूल परिस्थितीमुळे तिचा वापर करू शकलो नाही, याची खंत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या चार टीम, एकूण 100 जवान, टीडीआरएफचे 80 जवान, स्थानिक बचाव पथकाच्या 5 टीम तसंच अनेक स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक मदतीसाठी आले आहेत.
इर्शाळगडाच्या पायथ्याशी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकेसह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा आणि इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आले. बचाव करण्यात आलेल्या नागरिकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी आवश्यक सोयी-सुविधा युक्त कंटेनर्स व इतर मुलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शोध आणि बचाव कार्यासाठी आवश्यक साहित्य तातडीने बेस कॅम्प येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी 60 कंटेनर मागवण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्थानिक माहितीवरून या आदिवासी वाडीमध्ये एकूण 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे. त्यातील सुमारे 17 ते 18 घरांवर दरड कोसळी आहे. बचाव कार्यात 98 व्यक्तींना सुरक्षित वाचवण्यास यश आले आहे. 228 पैकी उर्वरित 109 व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. इरसालवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App