टीव्हीवर मुलाखती देतोय सुरेश अण्णांचा फरार खोक्या; फडणवीस साहेब, वेळीच ओळखा “पवार संस्कारितांचा” धोका!!, असे म्हणायची वेळ सुरेश धस यांचा अनुयायी खोक्या भोसले याने टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीमुळे आली. संतोष देशमुख प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा स्वतंत्र व्हिडिओ जारी करून पुणे पोलिसांना शरण आला होता. त्याला पोलीस पकडू शकले नव्हते, तसेच सुरेश आण्णांच्या फरार खोक्या भोसलेला पोलिस अद्याप पकडू शकलेले नाहीत. पण त्याने कुठला स्वतंत्र व्हिडिओ जारी करून आपण निर्दोष असल्याचे सांगितले नाही, तर थेट टीव्ही ९ मराठीच्या पत्रकाराला मुलाखत देऊन मीडिया ट्रायल मध्ये निर्दोष असल्याचे सांगितले.
वाल्मीक कराड काय किंवा खोक्या भोसले काय पोलिसांना सापडत नाहीत, पण स्वतंत्र व्हिडिओ करून ते पोलिसांना शरण येतात किंवा टीव्ही चॅनेलला मुलाखती देतात हे महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचे चांगले लक्षण नाही. किंबहुना महायुती सरकार येऊन चारच महिन्यांच्या आत हे घडत असेल, तर एकूणच सरकारच्या प्रतिमेला देखील ते बरे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह खाते सांभाळायला सक्षम नाहीत, असे नॅरेटिव्ह शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस चालवतच होती. विशेषत: खासदार सुप्रिया सुळे या तर तो नॅरेटिव्ह चालवण्यात आघाडीवर होत्या आणि आहेत, पण त्याच वेळी सरकारमध्ये असलेला “पवार संस्कारित” घटक यासाठी कारणीभूत ठरतोय, ही बाब देखील दुर्लक्षित करून किंवा कानाआड करून चालणार नाही. धनंजय मुंडे हे सुरुवातीला वाल्मीक कराड पासून हात झटकत होते पण टप्प्याटप्प्याने वाल्मीक कराड ने केलेल्या गुन्ह्यांचे धागेदोरे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचलेच म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. या दरम्यान फडणवीस सरकारची प्रतिमा हानी झाली ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.
महाराष्ट्रातल्या गुन्ह्यांना जातीय वळण मिळाले हे दुर्दैव असल्याचे वेगवेगळे विचारवंत आणि माध्यमकर्मी बोलत असले तरी ते दुर्दैव हे कुठल्या दैवाने अथवा त्या दुर्दैवाने प्राप्त झालेले नाही, तर तो सरळ सरळ “पवार संस्कारित” नेत्यांच्या राजकीय दुष्कर्तृत्वाचा भाग असल्याचेच ठळकपणे दिसून येते. कारण धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे आज जरी वेगवेगळ्या म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि भाजपमध्ये असले तरी ते मूळातले “पवार संस्कारित” नेते आहेत. त्यांचे वेगवेगळे “उद्योग” फार जुने आहेत, ही वस्तुस्थिती दडून राहिलेली नाही.
वाल्मीक कराड करत होता, ते “उद्योग” धनंजय मुंडे यांना माहिती नव्हते किंवा खोक्या भोसले याचे “उद्योग” सुरेश आण्णा धस यांना माहितीत नव्हते, असे कोणीच म्हणू शकणार नाही. किंबहुना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांनी जे वक्तव्य केले, त्यावरून तरी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातले “राजकीय अद्वैत” थेटच उघड झाले. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची शपथच द्यायला नको होती, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. यातून आपल्याच सरकारच्या राजकीय समजावर अथवा ज्ञानावरच त्यांनी ठळक प्रश्नचिन्ह लावून टाकले. सुरेश आण्णा तर धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे हात धुवून लागले होते. त्यानंतर खोक्या भोसलेचे प्रकरण उद्भवले.
यातला सगळा राजकीय कुरघोडीचा भाग जरी गृहीत धरला, तरी मूळात महायुतीचे फडणवीस सरकार ज्या प्रचंड बहुमतानिशी सत्तेवर आले आहे, त्या सरकारकडून जनतेला ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षेबरहुकूम निदान सरकारने सुरुवात तरी केली असे म्हणण्याची आज स्थिती नाही. भले प्रसार माध्यमे मीडिया ट्रायल मध्ये फडणवीस सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करत असतील आणि त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये बिलकुल तथ्य नसेल, असे जर गृहीत धरले, तरी वाल्मीक कराड किंवा खोक्या भोसले हे संशयित गुन्हेगार पोलिसांना सापडत नाहीत, तर ते व्हिडिओ जारी करून किंवा टीव्ही चॅनेलला मुलाखती देऊन आपले निर्दोषत्व मीडिया ट्रायल मध्ये सिद्ध करायचा प्रयत्न करतात ही बाब निश्चितच दुर्लक्ष करण्याजोगी नाही. किंबहुना ती राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर ठळक प्रश्नचिन्ह लावणारी आहे हे मान्यच करावे लागेल.
पण त्याही पलीकडे जाऊन हा सगळा “पवार संस्कारितांचा” खेळ आहे आणि तो महायुतीच्या फडणवीस सरकारला भोवत चालला आहे ही तर वस्तुस्थिती आणखी डाचक आणि जाचक आहे. यावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर संबंधितांच्या नाड्या करकचून आवळायची गरज आहे, अन्यथा त्यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारला हेच “पवार संस्कारित” नेते नख लावल्याशिवाय राहणार नाहीत. शिवाय महायुतीचे सरकार आणि जुने काँग्रेस + राष्ट्रवादीचे सरकार यांच्यातला गुणात्मक फरक महाराष्ट्राच्या जनतेला देखील दिसू शकणार नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App