नाशिक : शरद पवार + सुरेश कलमाडी भेटीने (न मिळालेल्या) पंतप्रधान पदाच्या चर्चेला उजाळा; दोन्ही नेत्यांमध्ये nostalgic चर्चा!!, ही राजकीय घडामोडी आज पुण्यात घडली. एकीकडे संपूर्ण देशभर आणि जगातही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 75 वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असताना शरद पवार हे त्यांचे माजी सहकारी सुरेश कलमाडी यांच्या भेटीसाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी तब्बल 20 मिनिटे एकमेकांशी चर्चा केली. शरद पवारांनी सुरेश कलमाडींच्या तब्येतीची विचारपूस केली, तर सुरेश कलमाडी यांनी पवारांना “हाऊ आर यू?”, असा सवाल केला. त्यावर पवारांनी “आय एम फाईन!!” असे उत्तर दिले.
शरद पवार आणि सुरेश कलमाडी या “दोन खिलाडींची” भेट मराठी माध्यमांमध्ये मोठ्या चर्चेची ठरली. एकेकाळी महाराष्ट्राचे आणि देशाचे राजकारण गाजविणारे दोन मित्र नेते विशिष्ट राजकीय कारणांनी एकमेकांपासून दूर झाले. सुरेश कलमाडी राजकारणातून अस्तंगत झाले. शरद पवार निवृत्त होता होता राहिले. दोन्ही नेत्यांची बरीच वर्षे भेट झाली नव्हती. ती आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचा “राजकीय मुहूर्त” साधून झाली. त्यामुळे मराठी माध्यमांमध्ये त्या भेटीच्या मोठ्या बातम्या आल्या.
सुरेश कलमाडी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या काही विशिष्ट तपासण्या करण्यासाठी ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत. शरद पवारांनी तिथेच जाऊन कलमाडींची भेट घेतली डॉ.धनंजय केळकर यांनी शरद पवारांना कलमाडींच्या तब्येतीविषयीची तपशीलवार माहिती दिली.
– पवारांसाठी दिल्लीत लॉबिंग, पण…
पण त्या पलीकडे जाऊन शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांच्या आजच्या भेटीमुळे दोन्ही नेते फार nostalgic झाले. पण या भेटीमुळे मराठी माध्यमांना शरद पवारांच्या (न मिळालेल्या) पंतप्रधान पदाची आठवण झाली. 1991 मध्ये सुरेश कलमाडी यांनी शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी दिल्लीमध्ये मोठी लॉबिंग केली होती. त्यांनी म्हणे, काँग्रेसच्या 64 खासदारांना मोठ्या फाइव स्टार हॉटेलमध्ये बडा खाना दिला होता. पण नंतर दिल्लीतली बरीच चक्रे फिरली. ती पवार आणि कलमाडी यांच्या डोक्यावरून गेली. कलमाडींनी फार मोठे प्रयत्न करूनही पवारांना पंतप्रधान पद मिळाले नाही. पण नंतर कलमाडी हेच पवार विरोधी गटात “गुप्तपणे” सामील होते. त्यांनीच पवारांच्या गोटातल्या सगळ्या “खबरी” पी. व्ही. नरसिंह राव यांच्यापर्यंत पोहोचविल्या होत्या, अशा बातम्या त्यावेळच्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. पण त्यांची पुष्टी कुणी केली नव्हती.
– पवार – कलमाडींमध्ये अंतर पडले
पण त्यावेळी पासून पवार आणि कलमाडी यांच्यात अंतर पडायला सुरुवात झाली होती. कालांतराने पवार आणि कलमाडी यांचे राजकीय दृष्ट्या फाटले. काँग्रेसमध्ये राहूनही दोघही परस्पर विरोधी गटात राजकारण करत राहिले. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडली. पण पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरेश कलमाडी कधीच सामील झाले नाहीत. पुण्याच्या राजकारणातून कलमाडींना संपविण्यासाठी शरद पवारांनी अजित पवारांची पुण्याच्या राजकारणात पेरणी केली. त्यानंतर दोघांमध्ये अनेक वर्षे संघर्ष चालला. कॉमनवेल्थ घोटाळ्यातल्या फार मोठ्या राजकीय घडामोडीनंतर सुरेश कलमाडी राजकारणातून अस्तंगत होत गेले. या घोटाळ्यातून त्यांची निर्दोष सुटका झाल्यानंतरही कलमाडींचे राजकारणात पुनरागमन शक्य झाले नाही. कारण त्यांच्या तब्येतीने त्यांना साथ दिली नाही. त्या उलट शरद पवार निवृत्त होता होता राहिले. पण आजच्या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे पवारांच्या (न मिळालेल्या) पंतप्रधान पदाला उजाळा मिळाला. तू मराठी माध्यमांनी दिला. प्रत्यक्षात पवार आणि कलमाडी या दोन नेत्यांमध्ये त्या विषयावर चर्चा झाली की नाही, याची खात्रीशीर बातमी कुणालाही मिळाली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App