विशेष प्रतिनिधी
मुंबई : Parinay Phuke काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पेचावरून भाजप नेते तथा आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ” चंद्रपुरात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापित करता न येणे, हे काँग्रेससाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. वडेट्टीवारांची सध्या नाचता येईना अंगण वाकडं अशी अवस्था आहे,” असे परिणय फुके म्हणालेत. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठे विधान केले.Parinay Phuke
चंद्रपूर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसला सत्ता काबीज करता आली नाही, यावरून फुकेंनी काँग्रेसच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वडेट्टीवारांवरही निशाणा साधला. ” नाचता येईना अंगण वाकडं अशी सध्या वडेट्टीवारांची अवस्था आहे. वडेट्टीवार हे ना स्वतःच्या पक्षश्रेष्ठींचे ऐकतात, ना त्यांचे नगरसेवक त्यांचे ऐकतात, असा टोलाही त्यांनी लगावला. मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापन करता न येणे, हे काँग्रेससाठी अत्यंत लाजिरवाणे आहे,” असे परिणय फुके म्हणालेत.Parinay Phuke
विरोधकांना झोपेतही भाजप दिसतंय
“काँग्रेसमधील आपापसातील भांडणांमुळेच जनता त्यांना नाकारत आहे. निवडणूक हरल्यानंतर ईव्हीएम किंवा भाजपवर दोष देण्याची त्यांना सवयच झाली आहे. विरोधकांच्या घरात माशी जरी शिंकली, तरी त्याचा दोष ते भाजपलाच देतात; कारण त्यांना झोपेतही आता भाजपच दिसू लागला आहे,” अशी खोचक टीका त्यांनी केली.
चंद्रपुरात भाजपचाच महापौर बसणार!
चंद्रपूरच्या राजकारणाबाबत भाष्य करताना फुकेंनी ठाम दावा केला की, “चंद्रपुरात १०० टक्के भाजपचीच सत्ता येईल आणि भाजपचाच महापौर होईल.” काँग्रेसमध्ये सध्या मोठे गट-तट पडले असून, शहराला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेसचा एक गट फुटून भाजपकडे येऊ शकतो, असे सूचक संकेतही परिणय फुके यांनी यावेळी दिले. भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक पूर्णपणे अस्वस्थ झाले असून, आगामी निवडणुकांतही जनता भाजपलाच कौल देईल, असा विश्वास परिणय फुके यांनी व्यक्त केला.
शरद पवारांबाबत मोठे भाष्य
शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत फुकेंनी मोठे विधान केले. ते म्हणाले, शिवसेना (उबाठा) आणि महाविकास आघाडी हे आता एक ‘बुडते जहाज’ आहे. शरद पवार हे अत्यंत प्रगल्भ नेते आहेत. ते अशा बुडत्या जहाजात जास्त काळ बसतील असे मला वाटत नाही. भविष्यात ते महायुतीत सहभागी होतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये येण्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. यात अद्याप ठोस तथ्य नसले, तरी राजकारणात वेळेनुसार बदल नक्कीच घडतील, असेही फुके यांनी नमूद केले.
भुजबळांच्या ‘क्लीन चिट’वर स्पष्टीकरण
छगन भुजबळ यांना मिळालेल्या क्लीन चिटबाबत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांनाही फुकेंनी चोख प्रत्युत्तर दिले. “ही क्लीन चिट भाजप किंवा राज्य सरकारने दिलेली नाही, तर ती न्यायालयाने दिली आहे. मांडलेली तथ्ये आणि पुराव्यांच्या अभावामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला असून, यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App