विशेष प्रतिनिधी
नाशिक : भारतीय जीवनदृष्टीतील अध्यात्म, सेवा, करुणा, संस्कृती, राष्ट्रसंस्कार व सामाजिक समरसतेच्या चिरंतन परंपरेला नवचैतन्य देण्याचे कार्य रामतीर्थ गोदावरी सेवा समिती गेल्या अनेक वर्षांपासून करत असून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार प्रदान करण्याची परंपरा समितीने निर्माण केली आहे. या परंपरेचा विस्तार करत यावर्षीपासून भारतीय ज्ञानपरंपरेच्या व्यापक विश्वाला समर्पित असा एक नवा राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात आला असून त्याचे नाव “रामतीर्थ गोदा प्राच्यविद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कार” असे घोषित करण्यात आले आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने यासंदर्भात आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.Pandit Rajeshwar Shastri Joshi (Dharwad) gates Ramatirth Oriental research National award
– पुरस्काराचे नामकरण का आणि कसे??
या पुरस्काराचे नामकरण “प्राच्यविद्याप्रकाश” असे करण्यामागे समितीची स्पष्ट आणि दूरदृष्टीपूर्ण भूमिका आहे. भारतीय ज्ञानपरंपरा केवळ वेद व धर्मशास्त्रापुरती मर्यादित नसून उपनिषद, मीमांसा, न्याय, वैशेषिक, योग, सांख्य यांसारखी दर्शने, बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञान, आगम परंपरा, श्रमण-संस्कृती, पालि-प्राकृत व अपभ्रंश साहित्य तसेच विविध प्राच्य भाषांतील तत्त्वज्ञान व चिंतनपरंपरा यांचा विशाल संगम आहे. म्हणूनच वेद – शास्त्र परंपरेतील विद्वानांबरोबरच बौद्ध, जैन, दर्शन, भाषाशास्त्र, इतिहास आणि अन्य प्राच्यविद्यांच्या अभ्यासकांनाही सन्मानित करण्याचा समितीचा दीर्घकालीन संकल्प असून, हा पुरस्कार संपूर्ण भारतीय ज्ञानपरंपरेचा दीपस्तंभ ठरेल, असा समितीचा विश्वास आहे.
– पहिल्या प्राच्यविद्याप्रकाश पुरस्कारासाठी वेदमूर्ती पं. राजेश्वर शास्त्री जोशी यांची निवड
या नव्या पुरस्काराचा पहिला मान ऋग्वेद परंपरेचे मूर्धन्य विद्वान, वेद – शास्त्र आणि धर्मशास्त्र परंपरेतील अग्रणी आचार्य, गुरुकुलीय शिक्षणपद्धती आणि आधुनिक विद्यापीठीय संशोधन यांचा सजीव संगम साधणारे वेदमूर्ती पं. राजेश्वर शास्त्री जोशी (धारवाड, कर्नाटक) यांना प्रदान करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. ही निवड भारतीय ज्ञानपरंपरेच्या उज्ज्वल वारशाचा गौरव असून शास्त्रविद्येच्या पुनरुज्जीवनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना समितीने व्यक्त केली आहे.
– राष्ट्रीय स्तरावरील निवड समितीची प्रक्रिया
या पुरस्कारासाठी समितीने देशातील विविध विद्यापीठे, संशोधन संस्था आणि परंपरागत वेद – धर्मशास्त्र क्षेत्रातील मान्यवर विद्वानांची एक सन्माननीय निवड समिती गठित केली होती.
– समितीचे सदस्य :
– डॉ. रवींद्र मुळे, प्रमुख, संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
– डॉ. भाग्यलता पाटसकर, संस्कृत विदुषी, वैदिक संशोधन मंडळ
– डॉ. हरेकृष्ण अगस्ती, समन्वयक, वेद विभाग, महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक
– डॉ. निलाभ तिवारी, प्रमुख, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, नासिक शाखा
– वेदमूर्ती शांताराम शास्त्री भानोसे, ज्येष्ठ धर्मशास्त्रज्ञ
– न्या. दीपक खोचे, सहाय्यक धर्मदाय आयुक्त, अमरावती विभाग
यांचा समावेश होता.
या समितीने देशभरातील विद्वानांचा सखोल, तुलनात्मक आऊ वस्तुनिष्ठ अभ्यास करून एकमताने वेदमूर्ती पं. राजेश्वर शास्त्री जोशी यांच्या नावाची शिफारस केली.
– पुरस्काराचे स्वरूप आणि सन्माननीय पुरस्कर्ते
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या विनंतीवरून यावर्षीचा रामतीर्थ गोदा प्राच्यविद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कार नाशिकचे सन्माननीय पोलीस आयुक्त श्रीमान संदीपजी कर्णिक यांच्या सहकार्याने प्रदान करण्यात येणार आहे.
– पुरस्काराचे स्वरूप
₹ 1,00,000/- रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र, महावस्त्र असे गौरवचिन्हात्मक असेल.
– दिनांक 31 जानेवारी रोजी भव्य राष्ट्रीय समारंभ
हा पुरस्कार वितरण समारंभ दिनांक 31 जानेवारी रोजी, सायंकाळी 6.00 वाजता, नाशिक येथील रामतीर्थ गंगा घाट या पावन स्थळी केंद्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या समारंभाला सन्माननीय केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री श्री. गजेंद्र शेखावत, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका वंदनीय शांता कुमारी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
– रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार पद्मश्री सुभाषजी शर्मा यांचा सन्मान
याच समारंभात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा प्रतिष्ठित ‘रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार’ यावर्षी देशातील ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ पद्मश्री सुभाषजी शर्मा यांना प्रदान करण्यात येणार आहे. शाश्वत शेती, पर्यावरण संवर्धन, ग्रामस्वराज्य व ग्रामीण विकासासाठी त्यांच्या दीर्घकालीन योगदानाचा हा गौरव आहे.
1111 महिलांची भव्य गोदा आरती गोदा जन्मोत्सवाचा ऐतिहासिक क्षण
या कार्यक्रमासोबतच गोदा जन्मोत्सवानिमित्त 1111 महिलांची भव्य, दिव्य गोदा आरती रामतीर्थ गंगा घाटावर संपन्न होणार असून, हा क्षण नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्णपृष्ठ ठरणार आहे. विविध समाजघटकांतील महिलांच्या सहभागातून साकार होणारी ही सामूहिक आरती सामाजिक समरसता, नारीशक्ती व अध्यात्मिक चेतनेचा अनुपम संगम घडवणार आहे.
– रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा व्यापक दृष्टिकोन
रामतीर्थ गोदावरी सेवा समिती अध्यात्म, सेवा, पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन, संस्कृती, विद्या-साधना व राष्ट्रसंस्कार या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असून रामतीर्थ परंपरेला आधुनिक समाजजीवनाशी जोडण्याचे कार्य करत आहे. “प्राच्यविद्याप्रकाश” पुरस्काराच्या माध्यमातून वेद, शास्त्र, दर्शन, बौद्ध-जैन तत्त्वज्ञान, आगम परंपरा, भाषाशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील विविध विद्याशाखांना समान सन्मान देण्याची समितीची दूरदृष्टी अधोरेखित होते.
या पत्रकार परिषदेला अध्यक्ष जयंत गायधनी, शांताराम शास्त्री भानोसे, उपाध्यक्ष नरसिंह कृपा प्रभू , सचिव मुकुंद खोचे, खजिनदार आशिमा केला, डॉ. अंजली वेखंडे, रामेश्वर मालाणी, शैलेश देवी, वैभव क्षेणकल्याणी, डॉ. सतीश लुंकड, हेरंब गोविलकर, शिवाजी बोंदारडे, कविता देवी, प्राची भालेराव, वीणा गायधनी, अक्षय शेरताटे, स्वरा क्षेकल्याणी, अमेय काथे, सार्थक खोचे, ऋषिकेश खैरनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App