विशेष प्रतिनिधी
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणे हा संविधानाचा अपमान असून, सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. Vijay Vadettiwar
सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचे कारण स्पष्ट करताना वडेट्टीवार म्हणाले की, “परंपरेनुसार विरोधी पक्षाला चहापानाचे निमंत्रण दिले जाते. आम्हाला वैयक्तिक निमंत्रणे मिळाली, मात्र दोन्ही सभागृहांतील घटनात्मक महत्त्वाची असलेली विरोधी पक्षनेते पदे रिक्त आहेत. सत्ताधाऱ्यांचा ही पदे भरण्याचा कोणताही मनसुबा दिसत नाही. संविधानावर अविश्वास दाखवणाऱ्या आणि मनमानी कारभार करू पाहणाऱ्या सरकारच्या चहापानाला जाणे आम्हाला योग्य वाटत नाही.”
काँग्रेसने विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवले नाही
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी इतिहासातील दाखले देत सरकारला आरसा दाखवला. ते म्हणाले, “१९८० मध्ये जनता दलाचे अवघे १४ आमदार असताना आणि १९८५ मध्ये भाजपचे १६ आमदार असतानाही काँग्रेसने त्यांना विरोधी पक्षनेते पद दिले होते. काँग्रेसने सत्ताधारी म्हणून हे घटनात्मक पद कधीही रिक्त ठेवले नाही. मात्र, सध्याच्या सरकारला विरोधकांची भीती वाटते का? की त्यांना कोणाचाही अंकुश नसताना मनमानी कारभार करून राज्याचा गाडा हाकायचा आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांची फसवणूक: ‘तारीख पे तारीख’
राज्यातील शेतकरी प्रश्नांवरूनही वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. “राज्यात दररोज सहा ते सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. मतांसाठी कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या सरकारने आता ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू केला आहे. आता जूनचा मुहूर्त सांगितला जात असला तरी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा काहीही पत्ता नाही,” अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप केला.
2024 साली 2706 शेतकरी आत्महत्या
देशभरात 2014 सालापासून एक लाख 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील 38.5 टक्के शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत. हे सत्ताधाऱ्यांना भूषणावह आहे का? असा विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात 2025 साली पहिल्या आठ महिन्यात 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2024 साली 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
तिघेही एकमेकांशी भांडताय, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही
हे नतभ्रष्ट सरकार आहे. तिघेही जण भांडत आहेत. पण, शेतकऱ्यांकडे यांचे लक्ष नाही. हे म्हणतात की, आम्ही 27 नोव्हेंबरला अतिवृष्टी संदर्भातील मदतीचा प्रस्ताव पाठवला. केंद्रीय कृषिमंत्री म्हणतात की, आमच्याकडे प्रस्तावच आला नाही. तो कदाचित गृहमंत्र्यांकडे अडकून पडला होता, अशी देखील काही चर्चा होत आहे. राज्यात शेतकऱ्यांना अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही. शेतकरी विरोधी सरकारच्या चहापानाला जाण्याचे औचित्य आम्हाला वाटत नाही, असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.
नेत्यांकडून शेतकऱ्यांचा पदोपदी अपमान
अजित पवार म्हणतात की, हे शेतकरी फुकटे आहेत. भारतीय जनता पक्षातील आणि सत्तेतील नेत्यांनी पदोपदी शेतकऱ्यांच्या भरोशावर मोठे होऊन शेतकऱ्यांचा अवमान करण्याचे ठरवले असेल तर अशा सरकारच्या चहापानाला जाण्याचे आम्ही टाळले आहे. राज्याची तिजोरी खाली झालेली आहे. नऊ लाख 32 हजार कोटी रुपयांचे कर्ज राज्यावर आलेले आहे. यात विशेष करून राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा जवळपास 22 टक्के कर्ज आणि व्याज फेडण्यात जात आहे. निधी वाटपात सुद्धा प्रचंड भेदभाव होत असून, संपूर्ण राज्य दिवाळखोरीकडे निघाले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
लाडक्या बहिणींच्या रक्षणाकडे दुर्लक्ष
विजय वडेट्टीवार म्हणाले की, लाडकी बहीण, लाडकी बहीण म्हणून पाठ थोपटणाऱ्या सरकारचं लाडक्या बहिणीच्या रक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. राज्यात 18 वर्षाखालील चिमुकल्या असुरक्षित आहेत. 2021 ते 2025 साली राज्यात लहान मुलींवरील अत्याचारांचे 37,000 गुन्हे दाखल झालेले आहेत. दररोज 24 अल्पवयीन मुलींची छेड आणि अत्याचाराचे गुन्हे नोंदवले जात आहेत. लाडक्या बहिणींचं रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरलेले आहे.
सरकार पोलिसांना पाठिशी घालतंय
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही सापडत नाही. तो अजून देखील फरार आहे. कोर्टात ते प्रकरण धिम्या गतीने सुरू आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कोर्टाने पोलिस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांवर कुठलीही कारवाई होत नाही. सरकार पोलिसांना पाठीशी का घालत आहे? असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App