वृत्तसंस्था
पुणे : Nilesh Ghaiwal, पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याची अधिकृत पुष्टी मिळाली आहे. पुणे पोलिसांनी यूके हाय कमिशनला पाठवलेल्या पत्रानंतर या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हाय कमिशनकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश घायवळ हा सध्या लंडनमध्ये आपल्या मुलासोबत राहत असून त्याचा व्हिसा 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत वैध आहे. घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला असला तरी, तो परदेशातच असल्याने त्याच्या शोधासाठी यूकेतील स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी घायवळला तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी केली होती, आणि या प्रकरणी दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार सुरू आहे.Nilesh Ghaiwal,
पुणे पोलिसांनी युनायटेड किंगडमच्या हाय कमिशनकडे लिहिलेल्या पत्रात घायवळने पासपोर्ट मिळवताना बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा गंभीर आरोप केला होता. या पत्रात पोलिसांनी घायवळविरुद्ध दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांचा उल्लेख करत त्याला तातडीने ताब्यात घेण्याची मागणी केली होती. घायवळने चुकीच्या पत्त्यावरून आणि घायवळ ऐवजी गायवळ असे बदललेले नाव वापरून पासपोर्ट मिळवला होता. तपासात अहिल्यानगर मधील या नावाचा पत्ता अस्तित्वात नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याने केलेल्या फसवणुकीबाबत आता पोलिसांकडून स्वतंत्र तपासही सुरू आहे.Nilesh Ghaiwal,
नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीने सप्टेंबर महिन्यात पुण्यातील कोथरूड परिसरात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गोळीबार आणि मारहाणीच्या घटना घडवल्या होत्या. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर, घायवळ आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु मुख्य आरोपी घायवळ मात्र 11 सप्टेंबरपासून परदेशात असल्याचे तपासात समोर आले.
बनावट प्रतिज्ञापत्र सादर करून पासपोर्ट मिळवला
या आधी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, घायवळने हे आदेश मोडून परदेशात पलायन केले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आणि त्यानुसार पासपोर्ट रद्द करण्यात आला. पोलिसांचा संशय आहे की, घायवळने बनावट प्रतिज्ञापत्र सादर करून पासपोर्ट मिळवला आणि त्यात स्वतःविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे खोटे विधान केले.
कायदेशीर प्रक्रियेचा वेग वाढण्याची शक्यता
सध्या घायवळ लंडनमध्ये आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या निमित्ताने राहतोय, अशी माहिती यूके हाय कमिशनने पुणे पोलिसांना दिली आहे. तथापि, घायवळविरुद्ध दाखल असलेले गंभीर गुन्हे आणि बनावट कागदपत्रांद्वारे परदेशात जाण्याच्या कारवायांमुळे भारत आणि यूके दरम्यान कायदेशीर प्रक्रियेचा वेग वाढण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांकडून त्याला परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यूके सरकारच्या सहकार्याने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App